छत्रपती राजर्षी शाहू महाराज

छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृतिदिनानिमित्त (६ मे) त्यांच्या कारकीर्दीचा थोडक्यात आढावा...

छत्रपती राजर्षी शाहू महाराज मुख्य फोटो
मुख्य फोटो

छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे कोल्हापूर संस्थानचे प्रागतिक अधिपती आणि थोर समाजसुधारक होते. प्राथमिक शिक्षण, जातिभेद-निवारण, अस्पृश्यता-निवारण इत्यादी सुधारणांचे ते पुरस्कर्ते होते. त्यांचा जन्म कागलच्या जहागीरदार घाटगे घराण्यात जयसिंगराव आणि राधाबाई या दाम्पत्याच्या पोटी २६ जून १८७४ रोजी झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव यशवंतराव. चौथ्या शिवाजींच्या अकाली निधनानंतर १७ मार्च १८८४ रोजी ते कोल्हापूरच्या गादीवर दत्तक गेले. राजकोट व धारवाड येथे त्यांचे शिक्षण झाले. सर फ्रेझर व रघुनाथराव सबनीस यांच्यासारखे गुरू त्यांना मिळाले. विद्यार्थिदशेत त्यांनी इंग्रजी, संस्कृत, इतिहास, राज्यशास्त्र इत्यादी विषयांचा अभ्यास केला. त्यांना दोन एप्रिल १८९४ रोजी राज्याधिकार प्राप्त झाला. त्यांनी प्रशासन-यंत्रणेनची पुनर्ररचना करून भास्करराव जाधव, दाजीराव विचारे, आ. ब. लठ्ठे यांच्यासारख्या बहुजन समाजातील कर्तबगार व गुणी व्यक्तींना अधिकारावर नेमण्यास सुरुवात केली. १८९७-९८ साली प्रथम दुष्काळ व नंतर प्लेग अशी संकटे कोसळली. तरुण शाहूंनी धैर्याने त्यांवर मात केली. १९०२ साली सातव्या एडवर्डच्या राज्यारोहणानिमित्त त्यांनी युरोपचा दौरा केला. तेथील भौतिक प्रगतीचा मोठा प्रभाव त्यांच्यावर पडला.

बहुजन समाज शिकून शहाणा झाल्याशिवाय त्यांचे दारिद्र्य, अज्ञान व अंधश्रद्धा नष्ट होणार नाहीत, हे जाणून शाहूंनी शिक्षणाच्या, विशेषतः प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारावर भर दिला. त्यानुसार त्यांनी १९१७ साली आपल्या संस्थानात सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला आणि तो अमलात आणला. प्रत्येक खेड्यात प्राथमिक शाळा सुरू केली. प्राथमिक शिक्षणावर या संस्थानात होणारा खर्च मोठा होता. खेड्यापाड्यांतील मुलांना उच्च शिक्षणाची सुविधा मिळावी, म्हणून शाहूंनी कोल्हापुरात अनेक जातिजमातींसाठी वसतिगृहे स्थापन केली. शिवाय नाशिक, पुणे, नगर, नागपूर इत्यादी अन्य ठिकाणी त्यांच्या प्रेरणेने व साह्याने अनेक वसतिगृहे सुरू झाली. त्यांच्या या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील अनेक पिढ्या शिकून तयार झाल्या. फक्त शिक्षणाची सोय करण्यापर्यंत न थांबता पुढे त्यांनी २६ जुलै १९०२ रोजी कोल्हापूर संस्थानातील ५० टक्के शासकीय नोकऱ्या मागासलेल्या वर्गासाठी राखीव ठेवल्याचा जाहीरनामा काढला. राखीव जागांचे धोरण अमलात आणणारे शाहू हे भारतातील पहिले राज्यकर्ते ठरले. 

अस्पृश्यतेचे उच्चाटन हे शाहूंनी आपले जीवितकर्तव्य मानले. संस्थानातील शाळा, पाणवठे, विहिरी, दवाखाने, कचेऱ्या इत्यादी सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यता पाळण्यास त्यांनी कायद्याने प्रतिबंध केला. त्यासाठी त्यांनी १९१८-१९मध्ये अनेक वटहुकूम जारी केले. त्यांनी अस्पृश्यांना सरकारी नोकरीत घेतले. समाजातील तलाठ्यासारख्या प्रतिष्ठेच्या जागा दिल्या. महार-वतन खालसा करून महारांची वेठबिगारीतून आणि गुन्हेगार मानल्या गेलेल्या जातींची हजेरी पद्धतीतून मुक्तता केली. खेड्यापाड्यांतील बलुतेदारांनाही त्यांच्या बलुतेपद्धतीतून मुक्त करून त्यांना समाजातील सर्व उद्योगधंदे खुले केले (१९१८). जोगिणी व देवदासी प्रथेस प्रतिबंध करणार कायदा जारी केला (१९२०). याच सुमारास शाहूंची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी भेट झाली (१९१९). 

बाबासाहेबांच्या मूकनायक या वृत्तपत्राला व पुढे त्यांच्या इंग्लंडमधील उच्च शिक्षणाला त्यांनी अर्थसाह्य केले. माणगाव व नागपूर येथील अस्पृश्यता निवारण परिषदांत ते बाबासाहेबांबरोबर सहभागी झाले. अस्पृश्यतेबरोबरच जातिभेदाशी शाहूंनी अखेरपर्यंत संघर्ष केला. आंतरजातीय विवाह हा जातिभेदावर रामबाण उपाय वाटून त्यांनी १९१८मध्ये आंतरजातीय विवाहास कायदेशीर मान्यता दिली. स्वत: पुढाकार घेऊन अनेक आंतरजातीय विवाह घडवून आणले. तसेच बालविवाहास प्रतिबंध करून नोंदणी विवाहाचा कायदा जारी केला. घटस्फोटाला व विधवापुनर्विवाहाला कायदेशीर मान्यता दिली. कुटुंबात होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळांपासून स्त्रीला संरक्षण देणारा कायदाही त्यांनी १९१९मध्ये मंजूर केला. मागासलेल्या वर्गांतील मुलींना व स्त्रियांना मोफत शिक्षणाची सुविधा निर्माण केली.

सामाजिक सुधारणांबरोबरच शाहूंनी शेती व उद्योगधंद्यांना प्रोत्साहन दिले. अनेक कृषी व औद्योगिक प्रदर्शने भरवली. पन्हाळ्यावर चहा, कॉफी, रबर यांच्या लागवडींचे प्रयोग केले. कृषी उत्पादनासाठी शाहूपुरी, जयसिंगपूर यांसारख्या बाजारपेठा वसविल्या. त्यामुळे कोल्हापूर ही गुळाची बाजारपेठ म्हणून देशात प्रसिद्ध पावली. शाहूंनी कोल्हापुरात कारखानदारीचा पाया रचला. शाहू मिलची स्थापना करून त्यांनी आधुनिक वस्त्रोद्योगाला चालना दिली. शाहूंनी बांधलेले राधानगरीचे धरण कृषी क्षेत्रात संस्थानाचा कायापालट करणार उपक्रम ठरला. संस्थानी मुलखातील हे सर्वांत मोठे धरण बांधून त्यांनी आपले संस्थान समृद्ध केले. शाहूंनी सहकारी संस्थांचा कायदा करून १९१३ साली सहकारी चळवळीची मुहूर्तमेढ रोवली.

शाहूंनी संगीत, नाट्य, चित्रकला, मल्लविद्या आदी कलांना राजाश्रय देऊन महाराष्ट्रात कलेच्या क्षेत्रात स्पृहणीय कामगिरी केली. अल्दियाखॉं, हैदरबक्षखॉं, भूर्जीखॉं, सुरश्री केसरबाई, गानचंद्रिका अंजनीबाई मालपेकर अशा अनेक गायक-गायिकांनी शाहूंच्या आश्रयाने अखिल भारतीय कीर्ती संपादन केली. त्यांनी अनेक नाटक कंपन्यांना व गुणी कलावंतांना आश्रय दिला. बालगंधर्व व संगीतसूर्य केशवराव भोसले हे थोर कलावंत शाहू महाराजांनी महाराष्ट्राला दिले. संगीत व नाट्यकलेच्या जोपासनेसाठी त्यांनी कोल्हापुरात भव्य पॅलेस थिएटर (केशवराव भोसले नाट्यगृह) बांधले. त्याच्या शेजारीच खुल्या नाट्यगृहाचीही सोय केली. मल्लविद्येच्या प्रांतात शाहूंनी संस्थानासह सर्व देशांतील मल्लांना उदार आश्रय दिला. रोमच्या आखाड्याच्या धर्तीवर कोल्हापुरात कुस्तीचे मैदान बांधले. त्यांच्या कारकीर्दीत कोल्हापूर ही मल्लविद्येची पंढरी बनली. खुद्द शाहू हे मल्लांचे मल्ल म्हणून प्रसिद्ध होते. याशिवाय त्यांनी कोल्हापुरात साठमारी हा हत्तीचा खेळ सुरू केला. शिकार तर त्यांचा आवडीचा छंद होता. पट्टीचे शिकारी म्हणून त्यांचा लौकिक होता.

शाहूंच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून कानपूर येथे कुर्मी क्षत्रिय सभेने त्यांना १९१९मध्ये राजर्षी ही उपाधी बहाल केली. या राजाने अज्ञानी बहुजन समाजाला जागृत करण्याचे व्रत अखेरपर्यंत सांभाळले. अखेरच्या दिवसांत त्यांचे द्वितीय पुत्र शिवाजी यांच्या अपघाती निधनाने (१९१८) ते खचून गेले. तशातच त्यांना मधुमेहाने ग्रासले होते. अखेर ६ मे १९२२ रोजी मुंबई येथे त्यांचे वयाच्या अवघ्या ४८व्या वर्षी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र राजाराम महाराज कोल्हापूरच्या गादीवर आले. 

अशा या थोर शाहू महाराजांना त्रिवार वंदन!

(संदर्भ : मराठी विश्वकोश)

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 06-05-2026 News publication date | Time: 06:55 AM News publication time | Views: 443 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 06-05-2026 News publication date | Time: 06:55 AM News publication time | Views: 443 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement