वेदमूर्ती पोखरणकरशास्त्रींच्या हस्ते झाले अनावरण; वर्षभर होणार विविध उपक्रमांचे आयोजन
रत्नागिरी : 'वेदांमधील ॐ हे चिन्ह वेद व शास्त्रांचे आद्य बोधचिन्ह आहे. बोधचिन्ह कळण्यासाठी आचरण शुद्ध पाहिजे आणि विचार मन व बुद्धी यांच्या एकत्रीकरणातून प्रकटलेला पाहिजे. रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे बोधचिन्ह अनावरण करताना आनंद होतोय. 'सदाचार: परमो धर्म:' हे बोधवाक्य संस्थेच्या यशस्वी शताब्दीकडे वाटचालीचे द्योतक म्हणावे लागेल,' असे प्रतिपादन वेदमूर्ती विनायकशास्त्री पोखरणकर गुरुजी यांनी केले. रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या राणी लक्ष्मीबाई सभागृहात अक्षय्य तृतीयेदिनी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या बोधचिन्हाचे अनावरण केल्यानंतर ते बोलत होते. या वेळी अॅड. रुची महाजनी, संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर आणि उपाध्यक्ष मानस देसाई आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
या वेळी मान्यवरांच्या हस्ते भगवान परशुराम, राणी लक्ष्मीबाईंच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी २०२७-२८ हे संघाचे शताब्दी वर्ष असल्याची माहिती दिली. वर्षभर विविध कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत. आता बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले असून, आणखीही नवनवीन उपक्रमांची आखणी करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. उपाध्यक्ष मानस देसाई यांनी बोधचिन्हांची संकल्पना विशद केली.
या वेळी प्रमुख पाहुण्या अॅड. महाजनी यांनी सांगितले, की 'कऱ्हाडे ब्राह्मण संघ अविरतपणे १०० वर्षे कार्यरत आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे. सामाजिक मूल्यांसाठी ज्ञातीबांधवांचे योगदान असले पाहिजे. कारण हिंदू समाजात कुटुंब प्रबोधनाची गरज निर्माण झाली आहे. हिंदुत्व टिकवण्यासाठी ब्राह्मण समाजाचेही योगदान असण्याची गरज आहे. अलीकडे सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये तरुण पिढीची संख्या कमी असते. या पिढीला अशा उपक्रमात सक्रिय करण्याची आवश्यकता आहे.'
बोधचिन्ह साकारणाऱ्या कलाकार सिद्धी वैद्य यांचा या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. या बोधचिन्हात राणी लक्ष्मीबाईंचे चित्र साकारले असून, शताब्दीनिमित्त व संघाचे अशी दोन बोधचिन्हे साकारण्यात आली आहेत. या वेळी डॉ. बी. डी. पाध्ये यांनी दिलेल्या देणगीतून संघातर्फे आदर्श परिचारिका म्हणून सौ. ऋतुजा काळगी यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी संघाचे सर्व पदाधिकारी, संचालक व ज्ञातीबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालिका प्रतिभा प्रभुदेसाई यांनी सूत्रसंचालन केले. संचालक उमेश आंबर्डेकर यांनी आभार मानले.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment