‘अमृत’च्या योजनांचा लाभ घेण्यासाठी डोमिसाइल सर्टिफिकेट घरबसल्या कसे काढायचे?

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या संस्थेतर्फे खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना विविध प्रकारच्या योजनांद्वारे साह्य केले जाते. त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अधिवास प्रमाणपत्र अर्थात डोमिसाइल सर्टिफिकेट आवश्यक असते. हे सर्टिफिकेट आपल्याला सेतू कार्यालयात जाऊन तर काढता येतेच; पण ऑनलाइन अर्थात ‘आपले सरकार’ पोर्टलवरून ते घरबसल्याही काढता येते. हे सर्टिफिकेट ऑनलाइन कसे काढायचे, याबद्दलची ही तपशीलवार माहिती…

‘अमृत’च्या योजनांचा लाभ घेण्यासाठी डोमिसाइल सर्टिफिकेट घरबसल्या कसे काढायचे? मुख्य फोटो
मुख्य फोटो

महाराष्ट्रात हे प्रमाणपत्र Certificate of Age, Nationality & Domicile अर्थात वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र या नावाने मिळते. त्यासाठी २० ते ५० रुपयांपर्यंत शुल्क आकारले जाते. अर्ज केल्यानंतर १५ दिवसांच्या कालमर्यादेत हे प्रमाणपत्र मिळू शकते. राज्य शासनाचे महसूल खाते अर्थात रेव्हेन्यू डिपार्टमेंट (Revenue Department) हे प्रमाणपत्र देते. त्या खात्याने दिलेली माहिती खाली दिली आहे.

वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र सेवा देण्यासाठी नियुक्त अधिकारी

– तहसीलदार

वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र सेवेसाठी अपील प्राधिकारी (Appellate Autorities)

– पहिले : उपविभागीय अधिकारी

– दुसरे : अतिरिक्त जिल्हाधिकारी

आवश्यक कागदपत्रांची यादी

अर्जदाराचा फोटो, अर्जदाराची सही

ओळखीचा पुरावा (कोणताही एक)

पॅन कार्ड, पासपोर्ट, RSBY कार्ड, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, वाहन चालवण्याचा परवाना, मनरेगा जॉब कार्ड, शासकीय किंवा निमशासकीय संस्थांकडून जारी केलेले ओळखपत्र

पत्त्याचा पुरावा (कोणताही एक)

पासपोर्ट, पाणी बिल, रेशनकार्ड, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, फोन बिल, वाहन चालवण्याचा परवाना, वीज बिल, मालमत्ता कराची पावती, 7/12 आणि 8अ उतारा / भाडे पावती

इतर कागदपत्रे (कोणतेही एक)

पाणी बिल, रेशनकार्ड, भाडे पावती, मतदार यादी शुल्क, फोन बिल, वीजबिल, विवाह प्रमाणपत्र, मालमत्ता कर पावती, मालमत्ता नोंदणी शुल्क, पतीच्या रहिवास पुराव्याची प्रत, 7/12 आणि 8अ उतारा / भाडे पावती

(अल्पवयीन असल्यास) वयाचा पुरावा (कोणताही एक)

SFC प्रमाणपत्र, बोनाफाइड प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, वडिलांचे रहिवास प्रमाणपत्र, प्राथमिक शाळेच्या नोंदवहीतील उतारा

रहिवास पुरावा (कोणताही एक)

तलाठ्याने दिलेला रहिवास पुरावा, ग्रामसेवकाने दिलेला रहिवास पुरावा, बिल कलेक्टरने दिलेला रहिवास पुरावा

इतर कागदपत्रे (सर्व अनिवार्य)

वरील यादीत नसलेले इतर कोणतेही कागदपत्र, स्वयंघोषणापत्र अर्थात सेल्फ डिक्लरेशन

अर्ज कसा करायचा?

आपले सरकार पोर्टलवर नोंदणी करा. https://aaplesarkar.mahaonline.gov.in

आधार पडताळणी करून किंवा मोबाइलवर OTP मिळवून युझर आयडी आणि पासवर्ड तयार करण्यासाठी दिलेल्या पर्यायांपैकी कोणताही एक पर्याय निवडा.

मोबाइल OTP भरून अर्जदाराची माहिती, अर्जदाराचा पत्ता, मोबाइल क्रमांक, युझरनेम पडताळणी, फोटो अपलोड, ओळख पुरावा अपलोड, पत्ता पुरावा अपलोड करून नोंदणी पूर्ण करा.

नोंदणीनंतर डाव्या बाजूच्या पॅनेलमधून महसूल विभाग निवडा.

उपविभागाच्या ड्रॉप-डाउन मेनूमधून ‘महसूल सेवा’ (Revenue Services) निवडा आणि ‘प्रोसीड’वर क्लिक करा.

‘वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र’ ही सेवा निवडा. (Age, Nationality & Domicile Certificate)

कागदपत्रांची यादी पाहून ‘प्रोसीड’वर क्लिक करा.

प्रमाणपत्राचा प्रकार निवडा आणि अर्जदाराची माहिती, पत्ता, लाभार्थ्याची माहिती, सध्याचा पत्ता, जन्म कुठे झाला याचे तपशील, शिक्षणाचे तपशील व स्थलांतराशी संबंधित माहिती भरा.

Declaration स्वीकारा आणि अर्ज सबमिट करा.

कागदपत्रे अपलोड करा. सेल्फ डिक्लरेशन अर्थात स्वयंघोषणापत्राचा फॉरमॅट पोर्टलवर अर्जातच दिलेला असतो. त्यानुसार ते तयार करावे. सेवा शुल्क भरून अर्ज पूर्ण करा.

अर्ज सादर केल्यानंतर काय होते?

नागरिकाने केलेला अर्ज तहसील लिपीकाकडे प्राप्त होतो. अर्ज, जोडलेली कागदपत्रे आणि पेमेंट यांची ऑनलाइन पडताळणी तहसील लिपिक (तहसील क्लार्क) करतो.

सुधारणा आवश्यक असल्यास तहसील लिपिक अर्जदाराला टिपांसह दुरुस्ती विनंती (Rectification Request) पाठवतो. अर्जदाराने त्या टिपांनुसार अर्ज पुन्हा सादर करावा. दुरुस्ती आवश्यक नसल्यास अर्ज अव्वल कारकुनाकडे मंजुरीसाठी पाठवला जातो.

तहसील लिपिकाच्या मंजुरीनंतर अर्ज व जोडलेल्या कागदपत्रांची ऑनलाइन पडताळणी अव्वल कारकुनाकडून केली जाते. आवश्यकता असल्यास सुधारणा सुचवल्या जातात. त्यासाठी अर्जदाराला रेक्टिफिकेशन रिक्वेस्ट पाठवली जाते. अर्जदाराने त्या सुधारणा करून पुन्हा अर्ज सादर करणे आवश्यक असते. दुरुस्ती आवश्यक नसल्यास अर्ज मंजुरीसाठी तहसीलदारांकडे पाठवला जातो.

अव्वल कारकुनाच्या मंजुरीनंतर अर्ज व जोडलेल्या कागदपत्रांची ऑनलाइन पडताळणी तहसीलदारांकडून केली जाते. आवश्यकता असल्यास सुधारणा सुचवल्या जातात. त्यासाठी अर्जदाराला रेक्टिफिकेशन रिक्वेस्ट पाठवली जाते. अर्जदाराने त्या सुधारणा करून पुन्हा अर्ज सादर करणे आवश्यक असते. दुरुस्ती आवश्यक नसल्यास अर्ज मंजूर होतो आणि डिजिटल स्वाक्षरी असलेले प्रमाणपत्र अर्जदाराला पोर्टलवर उपलब्ध केले जाते. अर्जदार ते डाउनलोड करून घेऊन आवश्यक तिथे वापरू शकतो.

आपले सरकार पोर्टलवर लॉगिन करून अर्जदार Track Application यावर क्लिक करून अर्जाची सद्यस्थिती जाणून घेऊ शकतो.

Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 20-04-2026 News publication date | Time: 01:43 PM News publication time | Views: 2,060 Number of times this news has been viewed | District: Ratnagiri Related district of the news
Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 20-04-2026 News publication date | Time: 01:43 PM News publication time | Views: 2,060 Number of times this news has been viewed | District: Ratnagiri Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement