आद्य शंकराचार्य

वैशाख शुद्ध पंचमी हा आद्य शंकराचार्यांचा जयंतीदिन. त्या निमित्ताने, त्यांच्या कार्याचा हा अल्प परिचय...

आद्य शंकराचार्य मुख्य फोटो
मुख्य फोटो

ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या, जीवो ब्रह्मैव नापर:

ब्रह्म हेच एकमेव सत्य आहे, जग माया/भ्रम आहे आणि जीव ब्रह्मापेक्षा वेगळा नाही.

हिंदू धर्माचा हा थोर विचार जगाला देणारे महान व्यक्तिमत्त्व म्हणजे आद्य शंकराचार्य. सातव्या शतकात हिंदू धर्माची पुनर्स्थापना करणारे, हिंदू धर्माच्या पुनरुत्थानाचे जनक मानल्या जाणाऱ्या आद्य शंकराचार्यांचा जन्म वैशाख शुद्ध पंचमीला झाला. अद्वैत म्हणजे जीव-आत्मा आणि ब्रह्म-परमात्मा हे दोन भिन्न नसून एकच आहेत असे मानणे. आद्य शंकराचार्यांनी या अद्वैतवादाचा पुरस्कार केला. अखिल भारताच्या एकात्मतेची मूर्ती घडवणाऱ्या अद्वैतवादी वैदिक तत्त्वज्ञानी असणाऱ्या शंकराचार्यांनी भरतखंडाच्या चारही कोपऱ्यात वैदिक धर्माचा प्रसार केला. वेदांच्या आधाराने आणि वेदान्तसूत्रांच्या भक्कम पायावर त्यांनी आपले तत्त्वज्ञान लोकांपर्यंत नेले. 

'ज्ञान हाच मुक्तीचा एकमेव मार्ग आहे,' असे सांगणाऱ्या आद्य शंकराचार्य यांनी त्यांच्या अलौकिक बुद्धिमत्तेने जनमानसावर एक वेगळीच छाप उमटवली. पुन्हा नव्याने वैदिक धर्माची प्रतिष्ठापना भक्कमपणे केली. वेद हे ईश्वरप्रणित आहेत, असे ते म्हणत असत. वेदान्ताचे तत्त्वस्वरूप समजावून देणाऱ्या तत्त्ववेत्त्यांमध्ये आद्य शंकराचार्यांची योग्यता सर्वश्रेष्ठ मानली जाते. 

केरळमधील मलबार प्रांतात पूर्णा नदीच्या काठी वसलेल्या कालडी या गावी इ. स. ७८८मध्ये शंकराचार्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शिवगुरू होते. आद्य शंकराचार्यांच्या लहानपणीच त्यांच्या वडलांचे निधन झाल्याने त्यांचे पालनपोषण त्यांच्या आईने केले. अध्ययन व अध्यापन यांची एक उज्ज्वल परंपरा त्या घराण्यात पूर्वापार चालत आलेली होती. शंकराचार्यांनी आठव्या वर्षी सर्व वेदांचे अध्ययन पूर्ण केले. संन्यास घेण्याची परवानगी आईकडून मिळवून ते घराबाहेर पडले. आईवर त्यांचे अतोनात प्रेम होते. 

विंध्य, सह्याद्रीच्या आसपास शंकराचार्यांची गोविंद पूज्यपादाचार्य यांच्याशी भेट झाली. त्यांनी उपदेश करून शंकराचार्यांना संन्यासदीक्षा दिली. शंकराचार्यांनी वयाच्या बाराव्या वर्षी सर्व शास्त्रांत प्रावीण्य प्राप्त केले होते. त्यानंतर ते काशी येथे गेले. काशीच्या पंडितांशी धर्मचर्चेवर वाद-प्रतिवाद करून त्यांना आपल्या विद्वत्तेने प्रभावित केले. धर्मावरील वाद-प्रतिवादात ते जिंकले. त्यामुळे त्यांची महती, कीर्ती अतिशय वाढली. आद्य शंकराचार्य एक महान योगी, ग्रंथकार, अद्वैतमताचे प्रचारक, स्तोत्रकार होते. या वाद-प्रतिवादामुळे शंकराचार्य हे जगद्गुरू ठरले. 

आद्य शंकराचार्यांनी दोन ते तीन वेळा संपूर्ण भारतभ्रमण केले असावे. अनेक मोठ्या नगरांत आणि तीर्थक्षेत्री जाऊन वैदिक धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी शंकराचार्यांनी त्यांच्या शिष्यांसह भारतभ्रमण केले. त्यांना अद्वैत तत्त्वज्ञानाची शिकवण दिली. आपल्या भारतभ्रमणात शंकराचार्यांनी गोवर्धन पीठ (ओडिशा), शृंगेरी पीठ ( कर्नाटक), शारदापीठ (द्वारका) आणि ज्योतिर्मठ (हिमालय) अशा चार दिशांना चार पीठांची स्थापना करून शिष्यांना पीठाधिपती म्हणून नेमले. कांचीकामकोटी आणि काशी येथेही त्यांनी पीठे स्थापन केली. आद्य शंकराचार्यांनी एकेश्वरवादाचा पुरस्कार केला. 'तणावमुक्त अवस्थेत जगा, पण त्यासाठी मन निर्मळ व निर्भय ठेवा,' असे ते नेहमी सांगत. 'चराचरात परमेश्वर सामावलेला असून, त्याचा आदर करायला हवा,' अशी त्यांची शिकवण होती. 

आद्य शंकराचार्यांनी प्रस्थानत्रयींवर म्हणजेच ब्रह्मसूत्र, उपनिषदे, भगवद्गीता आणि अन्य विषयांवर अनेक भाष्यग्रंथ लिहिले आहेत. त्यांनी तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ, संस्कृत स्तोत्रे, आणि तत्सम काव्ये रचली आहेत. आद्य शंकराचार्यांनी आखून दिलेल्या कार्यपद्धतीनुसारच आजही चारही धर्मपीठांची कामे सुरळीत सुरू आहेत.

विविध प्रकारच्या मतमतांतरांनी त्रस्त झालेल्या भारतीय लोकांमध्ये समन्वय साधून आद्य शंकराचार्य यांनी भारतीय मनाला भेदामध्ये अभेद पाहण्याची शिकवण दिली. आपल्या अद्वैत सिद्धांताद्वारे ही शिकवण भारतीयांच्या अंगी बाणवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ज्ञानप्रसाराचे इतके प्रचंड कार्य शंकराचार्य यांनी आपल्या अवघ्या बत्तीस वर्षांच्या आयुष्यात साधले. त्यांच्या विचारधारेचा प्रभाव आजही भारतात आहे. ते थोर तत्त्वज्ञ, महापंडित, प्रतिभावान कवी, समाजसुधारक आणि प्रभावी संघटक होते. आचार्यांनी आपले कार्य बौद्धिक, तात्त्विक आणि धार्मिक या तिन्ही स्तरांवर केले. निरनिराळ्या विचारधारांत एकसूत्रता आणण्याचा प्रयत्न केला. लोकजीवनात रूढ असलेले पंथ-भेद नष्ट करून सर्वांना ज्ञानाने मोक्ष मिळू शकतो हे पटवून दिले आणि ज्ञानोपासनेचा मार्ग दाखवून दिला. ‘मी सचेतन आणि आनंद आहे. मी शिव आहे! मी शिव आहे,’असे ते म्हणत. प्रत्येक सजीवात त्या परमेश्वराचा अंश असतो. प्रत्येक सजीवात परमेश्वर वास करत असतो, त्यामुळे माणसात देव असतो. हेच तत्त्व रुजवण्याचा आणि अंगीकारण्याचा संदेश त्यांनी दिला आहे. अशा या धर्मसंस्थापकाला त्रिवार वंदन!

(संकलित माहिती)

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 21-04-2026 News publication date | Time: 06:55 AM News publication time | Views: 404 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 21-04-2026 News publication date | Time: 06:55 AM News publication time | Views: 404 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 1 Comments

S
Sharad Godbole
21-04-2026 12:57 PM

आद्य शंकराचार्य जयंती निमित्त लिहीलेल्या लेख आवडला.माहीती छान संकलन केली आहे
त्या निमित्ताने शंकराचार्य चे जीवनाचे विविध पैलू व त्यांनी केलेले अपार कार्याची माहिती मिळाली धन्यवाद अमृत महाराष्ट्र

Write a Comment
0 / 50 words
Advertisement