महर्षी कण्व ऋषींचा प्राचीन आश्रम आणि गुंफा - अमृत महाराष्ट्र

महर्षी कण्व ऋषींचा प्राचीन आश्रम आणि गुंफा

महान तपस्वींच्या पाऊलखुणा असलेले जळगाव जिल्ह्यातील पवित्र स्थान

महर्षी कण्व ऋषींचा प्राचीन आश्रम आणि गुंफा  मुख्य फोटो
महर्षी कण्व ऋषींचा प्राचीन आश्रम आणि गुंफा  अतिरिक्त फोटो

कानळदा (ता. जि. जळगाव) या गावात गिरणा व अंजनी नदीच्या संगमस्थळी महर्षी कण्व ऋषींचा पुरातन आश्रम आहे. प्राचीन इतिहास आणि अनेक तपस्वींच्या पाऊलखुणा असलेले हे स्थळ आहे. कण्वऋषींची गुंफाही तिथे आहे. महर्षी कण्व ऋषींनी तपस्या केली होती, तो हा आश्रम साहजिकच पुरातन आहे. त्यांच्या अतिशय कठीण तपस्येमुळे हे ठिकाण शक्तीचे स्पंदन, सात्त्विक वलय आणि सात्त्विक संस्कारांनी भारलेलं आहे. महर्षी ब्राह्ममुहूर्तावर सामवेदाचे मंत्रोच्चार आणि वैदिक यज्ञ करत होते. आश्रमामध्ये त्यांच्याबरोबर अनेक महात्मा, सिद्ध पुरुष, ब्रह्मचारी आणि त्यांचे अनुयायी असत. या ठिकाणी नित्यनेमाने यज्ञ, जप, व्रत, अनुष्ठान आणि धार्मिक संवाद होत असत. हा आश्रम संस्कृती आणि आध्यात्मिक जीवनशैलीसाठी प्रसिद्ध होता.

हा तोच आश्रम आहे जो राजा दुष्यंत आणि शकुंतला यांच्या आयुष्याशी जोडलेला आहे. राजर्षी विश्वामित्रांची महान तपस्या, मेनकेकडून त्या तपस्येचा भंग, शकुंतलेचा जन्म, पालनपोषण, राजा दुष्यंत आणि शकुंतलाचा गांधर्वविवाह, शकुंतलेचा पुत्र सर्वदमनचा जन्म, त्याचे साहस, राजा दुष्यंत आणि शकुंतलेचा संवाद, शकुंतलेच्या पवित्रतेची प्रचीती, शकुंतला आणि पुत्र सर्वदमनचा राजा दुष्यंताद्वारे स्वीकार आणि शेवटी सर्वदमनचा राज्याभिषेक, जो भरत नावाने विख्यात झाला होता आणि त्यावरून या देशाचं नाव भारत पडलं... या सर्व घटना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रूपात या आश्रमाशी जुळलेल्या आहेत.

कलियुगाची सुरुवात झाल्याबरोबर आश्रमाची निर्मलता, धार्मिकता, पावित्र्य, संस्कार आणि आध्यात्मिकता संपली. मनुष्यवस्ती दूर झाल्यामुळे हे स्थान दारू, जुगाराचा अड्डा बनले होते. म्हणून या स्थानाची आध्यात्मिकता लुप्त होत गेली; मात्र सूक्ष्म रूपात राहणारे सिद्ध तपस्वी महर्षी आणि दैवी शक्तीने हे स्थान पवित्र होते. या स्थानाची जुनी कीर्ती परत आणण्यासाठी उच्चविद्याविभूषित योगींची गरज होती. पवित्र गुरुदेव स्वामी चंद्रकिरणजी तपोवन सरस्वती हे एक उच्चस्तरीय श्रेणीचे महर्षी होते. या स्थानाच्या पुनरुत्थानासाठी त्यांची निवड केली गेली. 

ध्यानस्थ असताना ब्राह्म मुहूर्तावर पहाटे दोन वाजता शनिवार, १३ एप्रिल १९६८ रोजी मुंबईमध्ये स्वामींना दिव्य आदेश मिळाला. गुरुदेवांनी ध्यानावस्थेमध्ये खूप गुंफा, वाहत्या नदीच्या किनारी एक जुनेपुराणे शिवमंदिर आणि जटाधारी वटवृक्षाचे दृश्य पाहिले. त्याबरोबरच त्यांना एक आवाजही आला, की 'हे पवित्र आत्मा कृपया या जुन्या आश्रमाचा स्वीकार करा आणि उद्धार करा. त्याची लुप्त झालेली पवित्रता आणि धार्मिकता पुन्हा स्थापित करा.' दिव्य शक्तीने हेही सांगितलं, की हे स्थान मुंबईहून ४१८ किलोमीटर अंतरावर आहे. गुरुदेव यांची उच्च कक्षा, आध्यात्मिकता, प्रतिभा, त्यांच्या उदयपूर घराण्याचा संबंध, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे शिक्षण यामुळे कोणतीही बाधा आली नाही. एक सच्चा भक्त आणि योग्याप्रमाणे त्यांनी सन्मान आणि निःस्वार्थ भावनेने स्वीकार केला. गुरुदेवांचे जीवनध्येय फक्त आदेशाचे पालन करणे एवढेच होते. दिव्यशक्तीने ध्येयप्राप्तीसाठी त्यांना साह्य केले. 

फक्त ११ दिवसांमध्ये २४ एप्रिल १९६८ रोजी गुरुजींनी स्थानिक लोकांशी संपर्क साधून हे ठिकाण शोधून काढले. खरोखर हा दिव्यशक्तीचा एक चमत्कार होता. गुरुदेवांनी नम्रतापूर्वक हा दिव्य आदेश मानला आणि या आश्रमाची गेलेली प्रतिष्ठा, पावित्र्य, संस्कृती, आध्यात्मिक वलय मोठ्या कष्टाने, परिश्रमाने पुन्हा स्थापित केले. दिव्यशक्तीच्या मदतीने हे काम त्यांनी सफलतापूर्वक पूर्ण केले. 

आश्रमातील जुन्या आध्यात्मिक पुस्तकांच्या विवरणांमध्ये या आश्रमाची माहिती मिळाली. गुरुदेवांनी अंतःकरणपूर्वक केलेल्या प्रयत्नांचे हे फळ आम्ही पाहतच आहोत आणि त्यांचा अनुभव घेत आहोत. कण्वाश्रम हे एक असे स्थान आहे, जिथे संसारी व्यक्ती आपल्या सर्व चिंता सोडून शांती आणि आनंदाचा अनुभव घेत असतात. खरोखर कण्वाश्रम हे एक अद्वितीय स्थान आहे. येथील ग्रंथात प्राचीन ग्रंथही आहेत.


Publisher: Rajendra Kanade News publisher name | Date: 15-04-2026 News publication date | Time: 02:13 PM News publication time | Views: 216 Number of times this news has been viewed | District: Jalgaon Related district of the news
Publisher: Rajendra Kanade News publisher name | Date: 15-04-2026 News publication date | Time: 02:13 PM News publication time | Views: 216 Number of times this news has been viewed | District: Jalgaon Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement