कुटुंबात सुख, समाधान, शांती नांदण्यासाठी ही सूत्रे आत्मसात करणे आवश्यक
आज समाजात कर्तव्यपराङ्मुखता वाढत आहे. तरुण पिढी आळशी होत आहे. लोकांना एकमेकांविषयी आस्था नाही. आपापसांत प्रेम, आपुलकी राहिलेली नाही. मनात निराशा बाळगणारे चारचौघांत हसरे दिसतात. माणसे औपचारिकतेपोटी समारंभात हजेरी लावतात. पारिवारिक कलह मोठ्या प्रमाणात सुरू झाले. यासाठीच समर्थ रामदासांनी आदर्श प्रपंचाची सूत्रे सांगितली आहेत. त्यांनी प्रयत्नवादाचे बीजारोपण केले. कुटुंबात सुख, समाधान, शांती नांदण्यासाठी समर्थ रामदासांनी सांगितलेली सूत्रे आत्मसात करणे ही आज समाजाची गरज आहे.
समर्थ रामदासांचा प्रयत्नावर विलक्षण भर होता. माणूस प्रयत्नांच्या साहाय्याने आपले भविष्य उज्ज्वल करू शकतो, अशी त्यांची धारणा होती. त्यांनी मानवकल्याणासाठी प्रयत्नवादाचा प्रसार आणि प्रचार केला. समर्थ म्हणतात -
रेखा तितुकी पुसोन जाते। प्रत्यक्ष प्रत्यया येंतें।
डोळेझांकणी करावी ते । कायेनिमित्य।।९।।
रामदासांनी दैववादीपणा, अंधश्रद्धेला विरोध केला. हातावरच्या रेषांमध्ये भविष्य पाहणाऱ्यांना त्यांनी खडसावले आहे, त्यांचे माथे ठिकाणावर आणण्याचे काम केले. कष्ट केल्याने हातावरील रेषा नाहीशी होते. त्यामुळे भविष्यावर काही परिणाम होत नाही. मेहनतीने मानव आदर्श जीवन जगू शकतो. डोळे झाकून कार्य करत राहावे, फळ नक्कीच मिळते असा रामदासांचा संदेश आहे.
आपुल्या पुरुषार्थवैभवें। बहुतांस सुखी करावें।
परंतु कष्टी करावें। हे राक्षेसी क्रिया।।२७।।
रामदासांचा हा संदेश अभ्यास करणाऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे. यश मिळत नसल्याने तरुणांमध्ये नैराश्य येते. त्यांच्या जीवनात प्रेरणा भरण्याचे काम रामदास करतात. रामदासांचे साहित्य ऊर्जास्रोत आहे. समर्थ रामदासांनी अकर्तृत्ववान लोकांना खडसावले आहे. कर्तव्यपराङ्मुख समाजाला कर्तव्यपरायण करण्यावर त्यांनी भर दिला. ते म्हणतात -
कांहीं मेळवी मग जेवी। गुंतल्या लोकांस उगवी।
शरीर कारणी लावी। कांहीं तरी।।२५।।
समर्थ रामदासांनी समाजात प्रयत्नवादाचे बीजारोपण केले. त्यांनी लोकांमध्ये श्रमप्रतिष्ठा रुजवली. ते प्रयत्न आणि परिश्रम करण्यास सांगतात. कष्ट केल्याने समाजात आत्मसन्मान मिळतो. स्वत:ची आणि कुटुंबाची प्रगती साधण्यासाठी अथक परिश्रम करावेत, असे समर्थ सांगतात. कुटुंबाचा विकास झाल्याने पर्यायाने राष्ट्राचा विकास होत असतो.
समर्थ रामदासांनी समाजात आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम केले. दासबोधात दशक १२ समास नऊ, दशक १९ समास चार आणि दशक १९ समास सात या तीन ठिकाणी प्रयत्नवादाचे धडे दिले आहेत. मानवामध्ये कोणते गुण असावेत आणि कोणते दुर्गण नसावेत, याबद्दल रामदासांनी सखोल चर्चा केली आहे.
अंतरीं नाहीं सावधानता। येत्न ठाकेना पुरता।
सुखसंतोषासी वार्ता। तेथें कैंची।।७।।
दशक १८ समास पाच आणि दशक १९ समास तीनमध्ये त्यांनी आळशी माणसाला करंटा म्हटले आहे. श्रोते शहामृगासारखे असावेत, त्यांनी दूध आणि पाणी वेगळे करावे अशी समर्थांची अपेक्षा आहे. श्रवण करताना चांगले ते घ्यावे आणि वाईट सोडून द्यावे असे समर्थ सांगतात. श्रवणाचे महत्त्व सांगताना समर्थ म्हणतात -
शुद्ध सोनें पाहोन घ्यावें। कसीं लाऊन तावावें।
श्रवणमननें जाणावें। प्रत्ययासी।।१४।।
संसाराचे रडगाणे सांगणाऱ्यांना रामदास खडसावतात. त्याचा उल्लेख १२व्या दशकाच्या नवव्या समासात आलेला आहे. प्रतिकूलतेवर मात करण्यासाठी ते प्रयत्नवादाची कास धरण्यास सांगतात. रामदासांनी अभ्यास, आचरण आणि ज्ञानाचा प्रचार याला विशेष महत्त्व दिले आहे. प्रयत्नशील व्यक्ती उपाशी मरणार नाही असा त्यांना विश्वास होता. ज्ञानाचा प्रसार आणि प्रचार करणाऱ्याला मान, सन्मान व प्रतिष्ठा लाभते. रामदासांनी कीर्तन आणि प्रवचनावर भर दिला आहे.
मूर्खांची लक्षणे : कामचुकार, कर्तव्यपराङ्मुख लोकांना रामदास मूर्ख म्हणतात. मूर्खाची लक्षणे त्यांनी १९व्या दशकाचा तिसरा समास आणि १८व्या दशकाचा पाचवा समास इथे सांगितली आहेत. आळस, स्वार्थ, दुश्चित्तपणा, कुसंगती अशा व्याधी माणसाला लागतात. त्यामुळे माणूस अनेकांचा वैरी होतो. स्वत:चा घात करून घेतो. याचे वर्णन समर्थांनी केले. करंटा मनुष्य कधीही कर्मयोगी होणार नाही. अशी व्यक्ती आत्मकेंद्री आणि भ्रष्ट असते. त्याच्यामुळे अनेकांची अंत:करणे दुखावतात. अशी व्यक्ती स्वत:चा आणि पर्यायाने समाजाचा घात करत असतो.
रामदास दासबोधामध्ये यत्न निरूपण आणि उत्तम पुरुषाची लक्षणे सांगतात. समाजासाठी प्रत्येक व्यक्तीने झिजावे असा सल्ला देतात. भोगवादी वृत्ती सोडण्यास सांगताना समर्थ म्हणतात -
झिजल्यावाचुनीं कीर्ती कैंची। मान्यता नव्हे कीं फुकाची।
जिकडे तिकडे होते चीची। अवलक्षणें।।२४।।
प्रयत्नवादी होणे किंवा आळसाने करंटा होणे यातील निवडीचे स्वातंत्र्य भगवंताने मानवाला दिले आहे. जीवनाचे नियम समजावून घ्यावेत आणि त्यानुसार आचरण करावे.
उदंड ओळखी होता। उदंड भाग्य होतसे।
उदंड कलह होता। उदंड लाथा खातसे।।
भाग्यवान व्हायचे, की लाथा खायच्या हे ज्याचे त्याने ठरवण्यास रामदासांनी सांगितले आहे. याकरिता आज श्रमप्रतिष्ठा निर्माण करणे ही काळाची गरज आहे. दुर्दैवाने लोकांचा कल कमीत कमी श्रमात अधिकाधिक मोबदला मिळावा किंवा कष्ट न करताच भरपूर पैसा मिळावा याकडे आहे. असा समाज आळशी व ऐतखाऊ बनतो. यातून लाचखोरी वाढते. भ्रष्टाचार बोकाळतो. भ्रष्ट समाज देशाला उधळीसारखा पोखरून टाकतो. समाज प्रामाणिक बनावा याकरिता रामदासांचे विचार आजही प्रेरणादायी ठरतात.
- प्रशांत घुगे, अकोला
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment