थोर कृष्णभक्त आणि हिंदी संतकवी सूरदास यांच्याविषयी...
सूरदास हे थोर कृष्णभक्त आणि हिंदी संतकवी होते. त्यांच्या जन्माविषयीची नेमकी माहिती उपलब्ध नाही; मात्र १७ एप्रिल १४७८ ही त्यांची जन्मतारीख असल्याचे काही उल्लेख आढळतात. विक्रम संवत १५३५मधील वैशाख शुक्ल पंचमी ही त्यांची जन्मतिथी असल्याचे काही अभ्यासकांचे म्हणणे आहे. त्या तिथीनुसार येणारा दिवस १७ एप्रिल नाही. त्यामुळे नेमका खरा जन्मदिन कोणता, याबद्दल साशंकता आहे. अर्थात, त्यामुळे त्यांच्या कार्याचे महत्त्व कमी होत नाही. त्यांच्या कार्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊ या.
दिल्लीपासून १३ किलोमीटर अंतरावर असलेल्या सीही नावाच्या खेड्यात गरीब, सारस्वत ब्राह्मण कुटुंबात सूरदासांचा जन्म झाला. ते जन्मांध होते; मात्र बालपणापासूनच ते गानविद्येत अत्यंत कुशल होते. त्यांना ज्योतिषविद्या अवगत होती व त्यावर त्यांनी काही काळ उपजीविकाही केली; पण पुढे वैराग्य आल्याने हा मार्गही त्यांनी सोडून दिला. कालांतराने यमुनाकाठी गौघाट येथे कुटी बांधून संत सूरदास यांनी अध्यात्मसाधनेला प्रारंभ केला. त्याच ठिकाणी पुष्टिमार्गाचे संस्थापक वल्लभाचार्य (१४७९–१५३१) यांचे शिष्यत्व त्यांनी स्वीकारले. वल्लभाचार्यांनी त्यांना पुष्टिमार्गाची दीक्षा दिली व श्रीकृष्णभक्तीचा उपदेश केला. वल्लभाचार्यांनी त्यांना गोकुळ येथे नेले व कृष्णभक्तिपर पदे रचण्याची आज्ञा दिली.
साधारण १४९६ ते १५१० या काळात सूरदासांचे वास्तव्य गौघाट येथे व त्यानंतर गोवर्धन येथे होते. उर्वरित आयुष्य त्यांनी वृंदावनातील श्रीनाथजींच्या पूजाअर्चेत व भजन-कीर्तनात व्यतीत केले. श्रीनाथजी म्हणजे गोवर्धन पर्वतावर प्रकटलेल्या श्रीकृष्णाचे रूप. होय. सूरदासांनी श्रीकृष्णभक्तिपर सहस्रावधी पदे रचली. त्यात मुख्यतः कृष्णाच्या बाललीला व तारुण्यातील जीवन यांची वर्णने प्राधान्याने येतात. सूरदासांचे साधुत्व, गीतमाधुर्य व गानकौशल्य या गुणांनी सहस्रावधी कृष्णभक्तांना मंत्रमुग्ध केले. अकबर बादशहा व सूरदासाची भेट तानसेनाच्या मध्यस्थीने मथुरेत झाली, असा उल्लेख हरिरायने केला आहे.
सूरदासाच्या पदांवर लुब्ध झालेल्या अकबराने आपली स्तुतिकवने रचण्याची आज्ञा सूरदासांना केली; पण ‘नहिं न रह्यो मन में ठौर’ म्हणजेच‘मी केवळ कृष्णकीर्तन करतो, अन्य कुणाचे कीर्तिगान करणे मला रुचत नाही’ असे परखड उत्तर सूरदासांनी दिले. तसेच त्याच्या कवित्वावर व गानमाधुर्यावर खूष होऊन अकबराने त्याला इनाम दिलेली काही गावे व द्रव्यही सूरदासांनी निःस्पृहपणे नाकारले. सूरदासांच्या स्फुट पदांचा संग्रह ‘सूरसागर’ या नावाने प्रसिद्ध आहे. भागवत पुराणाच्या आधारे रचलेल्या या ग्रंथात कृष्णाच्या लीलांचे गुणगान आहे. कृष्णजन्मापासून ते ब्रजभूमीतील क्रीडा, मथुरागमन, द्वारकेला प्रयाण व पुन्हा कुरुक्षेत्रात ब्रजवासी लोकांची भेट इथपर्यंतच्या सर्व घटनांचे साद्यन्त, क्रमवार वर्णन त्यात आहे. त्यांतील विविध रागांतील अनेक पदे फार लोकप्रिय झाली. तसेच त्यांतील ‘विनय पदे’ (प्रार्थनागीते) प्रसिद्ध आहेत. काही विद्वानांच्या मते ही पदे वल्लभाचार्यांकडून पुष्टिमार्गाची दीक्षा घेण्यापूर्वी सूरदासांनी रचली असावीत. तथापि या पदांतील प्रगल्भता, गांभीर्य, वैराग्याची ओढ इत्यादी वैशिष्ट्ये पाहता ती प्रौढ वयात रचली गेली असावीत, असेही एक मत आहे.
'सूरसागर'मधील काव्यदृष्ट्या सर्वांत हृदयस्पर्शी भाग म्हणजे ‘भ्रमरगीत’ होय. कंसवधासाठी मथुरेला गेल्यानंतर श्रीकृष्णाने काळजीत पडलेल्या गोकुळवासीयांना आपले कुशल वर्तमान कळवण्यासाठी उद्धवाला तेथे धाडले. ज्ञानमार्गी उद्धव व प्रेमभक्तिमार्ग अनुसरणाऱ्या गोपी यांच्यातील पद्यसंवाद भ्रमरगीतात आहे. नाट्यात्मता, काव्यात्मता, सहजसुलभ शैली इत्यादी वैशिष्ट्ये त्यात उत्तमरीत्या प्रकटली आहेत. निर्गुण, निष्प्रेम अव्यक्त मार्गापेक्षा सगुण प्रेममय व्यक्त मार्गाची भक्ती सहजसाध्य व श्रेष्ठतम आहे, हा यातील संदेश आहे. मधुर व कोमल ब्रज भाषेत रचलेल्या या पदांमध्ये सूरदासांचा भक्तिभाव व तत्त्वचिंतन प्रभावीपणे प्रकटले आहे. सूरदासांच्या पदांमध्ये वात्सल्य व शृंगार या दोन रसांचा उत्कृष्ट समन्वय साधलेला आढळतो.
कृष्णभक्तिपर पदे रचणाऱ्या आठ भक्तकवींच्या कविसंप्रदायामध्ये सूरदास अग्रगण्य मानले जातात. श्रीकृष्ण हा सर्वश्रेष्ठ परमेश्वर असून त्याची भक्ती व अनुग्रह (पुष्टी) हाच मानवाच्या अंतिम कल्याणाचा श्रेष्ठतम मार्ग, हे या संप्रदायाचे तत्त्वज्ञान सूरदासांनी सोप्या गेय पदांतून मांडले. गोस्वामी विठ्ठलनाथांनी सूरदासांचा ‘पुष्टिमार्गाचे जहाज’ या शब्दांमध्ये गौरव केला. 'सूरसागर'मध्ये काव्य व संगीत यांचा उत्तम मिलाफ साधला आहे. त्यांचे बहुश्रुत, अनुभवसंपन्न, विवेकशील, चिंतनशील, भक्तिभावपूर्ण व्यक्तिमत्त्व त्यांच्या काव्यातून प्रत्ययाला येते. सख्यभक्ती, वात्सल्यभक्ती, माधुर्यभक्ती, विनोदवृत्ती हे त्यांच्या काव्याचे विशेष मानले जातात. लौकिक व अलौकिक अशा उभयविध पातळ्यांवरील जीवनानुभूतींची प्रचीती त्यांच्या काव्यातून एकाच वेळी येते. त्यामुळेच सूरदासांना हिंदी साहित्यातील ‘सूर’ (सूर्य) म्हणून संबोधले जाते.
जन्मदिनाप्रमाणेच त्यांच्या मृत्युदिनाबद्दलही ठोस माहिती उपलब्ध नाही.
(संदर्भ : मराठी विश्वकोश)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment