मोरोपंत - अमृत महाराष्ट्र

मोरोपंत

प्राचीन मराठी पंडितकवींचे अग्रणी, आर्याभारतकार कवी मोरोपंत यांचा १५ एप्रिल हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने त्यांचा अल्प परिचय...

मोरोपंत  मुख्य फोटो
मुख्य फोटो

प्राचीन मराठी पंडितकवींचे अग्रणी, आर्याभारतकार अशी ओळख असलेले कवी मोरोपंत यांचा जन्म १८२९ साली झाला. त्यांचे संपूर्ण नाव मोरेश्वर रामचंद्र पराडकर असे होते. त्यांचे शिक्षण पन्हाळगड येथे केशव पाध्ये व गणेश पाध्ये या बंधूंकडे झाले. त्यांच्याजवळ मोरोपंतांनी काव्य, व्युत्पत्ती, अलंकार, वेदान्त इत्यादी विषयांचे अध्ययन केले व शिक्षणक्रम पूर्ण करून ते पन्हाळगडावरून बारामतीला आले आणि तेथे पेशव्यांचे जावई व सावकार बाबूजी नाईक यांच्याकडे त्यांचे आश्रित पुराणिक म्हणून राहिले. बारामतीला येऊन स्थायिक झाल्यावर त्यांनी पुराणकथन, ग्रंथावलोकन आणि काव्यरचना हे कार्य केले. 

मोरोपंतांची काव्यरचना विपुल असून, तिचे कालक्रमानुसार पाच खंड पडतात. त्यांनी वयाच्या बावीस-तेविसाव्या वर्षी काव्यरचनेला प्रारंभ केला असावा. विविध वृत्तांमध्ये रचिलेले कुशलव्याख्यान हे त्यांचे पहिले काव्य. त्याशिवाय या प्रारंभीच्या कालखंडात त्यांनी शिवलीलांचे वर्णन करणारा ब्रह्मोत्तर खंड आर्या वृत्तात लिहिला आणि भागवताच्या दशम स्कंधाच्या आधारे आर्यागीतावृत्तात कृष्णविजय लिहिण्यास सुरुवात केली. याच काळात प्रल्हादविजयाची रचनाही त्यांनी त्याच वृत्तात केली. त्यापुढील पाच वर्षांचा काळ (१७६१ ते १७६५) त्यांच्या श्लोकबद्ध रचनेचा कालखंड होय. त्यापुढील तिसरा कालखंड १७६६ ते १७७२ पर्यंतचा सहा वर्षांचा असून, त्या काळातील रचनेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे आर्यावृत्ताचे पूर्णपणे प्रस्थापित झालेले प्राबल्य होय. कृष्णविजयाची समाप्ती या कालखंडात झाली. त्याशिवाय सीतागीत, सावित्रीगीत आणि रुक्मिणीगीत ही तीन ओवीबद्ध काव्ये याच काळात लिहिली गेली. मंत्ररामायण, आर्याकेकावली, संशयरत्नावली, नामसुधाचषक इत्यादी ईशस्तोत्रे व काही भागवती स्तोत्रेही याच काळातील होत. 

यापुढील दहा वर्षांचा (१७३३ ते १७८३) कालखंड मोरोपंतांच्या काव्यजीवनात अत्यंत महत्त्वाचा असून त्याला महाभारतरचनेचा कालखंड म्हणता येईल. आतापर्यंत घटवून चांगले तयार केलेले आर्यावृत्त त्यांनी महाभारताच्या रचनेसाठी योजिले व महाराष्ट्राच्या हाती आपले मराठी आर्याभारत दिले. या दहा वर्षांत त्यांनी त्याशिवाय विशेष काही लिहिले नाही. त्यांच्या काव्यरचनेचा अखेरचा कालखंड म्हणजे महाभारताच्या समाप्तीपासून ते त्यांच्या निधनापर्यंतचा काळ. या अखेरच्या अंदाजे बारा वर्षांत मंत्रभागवत, हरिवंश, संकीर्ण रामायणे आणि मुख्य म्हणजे श्लोककेकावली हे त्यांचे अखेरचे काव्य असावे असे त्यातील ‘कृतान्तकटकामलध्वजजरा दिसो लागली’ या उद्‌गारांवरून वाटते. मोरोपंत स्वतः रामभक्त आणि सत्त्वशील वृत्तीचे गृहस्थाश्रमी होते. त्याबरोबर त्यांच्या ठिकाणी पांडित्यही होते. त्यांची बहुश्रुतता त्यांच्या काव्यात पदोपदी दिसते. 

आर्यावृत्त त्यांनी अतिकौशल्याने वापरले यात शंकाच नाही. त्यांचे वृत्तप्रभुत्व, शुद्ध भाषा, रसाळ निवेदन, प्रत्ययकारी वर्णनशैली आणि प्रभावी व्यक्तिदर्शन हे सर्व काव्यगुण विशेषकरून त्यांच्या आर्याभारतात एकवटलेले दिसतात. मोरोपंतांच्या सुसंस्कृत व समृद्ध काव्यरचनेमुळे मराठी भाषा श्रीमंत झाली यात संशय नाही. मोरोपंतांचे समग्र काव्य रा. द. पराडकर यांनी संपादित केले (९ खंड, १९१२–१६). त्याचे पुनर्मुद्रण १९६४–७२ या काळात करण्यात आले आहे. अशा या थोर साहित्यिकाचे १५ एप्रिल १७९४ रोजी बारामतीत निधन झाले.

(संकलित)

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 15-04-2026 News publication date | Time: 03:55 AM News publication time | Views: 220 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 15-04-2026 News publication date | Time: 03:55 AM News publication time | Views: 220 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement