एक्झॉटिक भाजीपाल्याला मुंबई-पुण्यापासून गोव्यापर्यंत उच्चभ्रू बाजारपेठांमध्ये मागणी
कराड (सातारा) : पूर्वीच्या काळी उदरनिर्वाहाच्या साधनांमध्ये शेती हा सर्वोत्तम पर्याय मानला जायचा. आजच्या काळात मात्र हवामानात सातत्याने होणारे बदल, सर्व प्रकारचा वाढलेला खर्च, मनुष्यबळाची कमतरता, वेगवेगळ्या प्रकारचे रोग आणि किडी अशा अनेक अडचणींमुळे शेती करणे अवघड झाले आहे. कष्ट तर प्रचंड करावे लागतात; मात्र उत्पन्न मिळेलच याची शाश्वती देता येत नाही. उत्पन्न मिळालेच तर किती मिळेल, याचीही खात्री सांगता येत नाही. थोडक्यात म्हणजे अनिश्चिततेच्या सावटाखाली शेतकऱ्याला सतत वावरावे लागते. या पार्श्वभूमीवर, आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन सातारा जिल्ह्यातील कराड येथील मानसी मिलिंद कुलकर्णी यांनी शेतीकडे पाहण्याचा एक नवा आणि सकारात्मक दृष्टिकोन समाजासमोर ठेवला आहे. त्यांनी हायड्रोपोनिक्स तंत्राने अर्थात मातीविना केवळ पाण्यावर केल्या जाणाऱ्या शेतीमध्ये उत्तम कामगिरी करून दाखवली आहे.
मानसी कुलकर्णी यांनी २०२३मध्ये सहा गुंठे जागेत हायड्रोपोनिक्स शेती करण्याचा धाडसी निर्णय घेतला. हायड्रोपोनिक्स हे असे तंत्रज्ञान असते, ज्यात झाडांची मातीत लागवड केली जात नाही, तर पाण्यातून विरघळलेले पोषक घटक देऊन ती वाढवली जातात. यासाठी जागा कमी लागते आणि नियंत्रित वातावरणात अधिक उत्पादन घेण्यासाठी ही पद्धत अत्यंत प्रभावी ठरते.
लागवड कशाची करायची हे ठरवण्याआधी बाजारपेठेचा विचार करणे आवश्यक असते. मानसी कुलकर्णी यांनी बाजारपेठेचा अभ्यास केला आणि मागणी ओळखून मानसी यांनी पारंपरिक पिकांऐवजी एक्झॉटिक म्हणजेच परदेशी भाज्यांच्या लागवडीवर लक्ष केंद्रित केले. त्यामध्ये लेट्यूस, बेसिल, चेरी टोमॅटो, ब्रोकोली आणि इतर भाज्यांचा समावेश केला. भाज्यांची चव, गुणवत्ता आणि ताजेपणा यामुळे अल्पावधीतच कुलकर्णी यांनी स्वतःचा एक वेगळा ग्राहकवर्ग निर्माण केला.
उत्पादन दर्जेदार असले, की बाजारपेठेतून चांगला प्रतिसाद आपोआप मिळतो, हे मानसी कुलकर्णी यांनी सिद्ध केले आहे. आज पुणे, मुंबईसारख्या मोठ्या शहरांसह गोव्यातील उच्चभ्रू बाजारपेठांमध्ये त्यांच्या भाजीपाल्याला मोठी मागणी आहे. हॉटेल व्यवसाय, सुपरमार्केट्स आणि आरोग्यप्रेमी नागरिक त्यांचे मुख्य ग्राहक आहेत.
केवळ सहा गुंठ्यांमध्ये सुरू केलेल्या या प्रयोगातून आज त्यांना चांगला आर्थिक नफा मिळत आहे. कमीत कमी पाण्याचा वापर आणि खतांचे अचूक नियोजन यामुळे उत्पादनाचा खर्च मर्यादित राहतो आणि नफ्याचे प्रमाण वाढते. आज त्या केवळ एक शेतकरी राहिल्या नसून, एक यशस्वी अॅग्रीप्रेन्युनर म्हणजे कृषी उद्योजक म्हणून नावारूपाला आल्या आहेत.
मानसी मिलिंद कुलकर्णी यांचा प्रवास म्हणजे केवळ एका प्रयोग नाही, तर 'शेती परवडत नाही' असे म्हणणाऱ्यांसाठी एक आदर्श उदाहरण आहे. योग्य नियोजन, तंत्रज्ञानाची जोड आणि कष्ट करण्याची तयारी असेल, तर छोटीशी जमीनही सोन्याची खाण ठरू शकते. शेतकरी अन्नदाता तर आहेच; पण तो आधुनिक उद्योजकही होऊ शकतो, हे मानसी कुलकर्णी यांच्या उदाहरणावरून दिसून येते.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment