ज्ञानपीठ विजेते साहित्यिक विंदा करंदीकर यांचा १४ मार्च हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने त्यांचा हा अल्प परिचय...
गोविंद विनायक करंदीकर म्हणजेच विंदा करंदीकर हे कवी, लेखक, अनुवादक, समीक्षक, ललित निबंधकार होते. त्यांचा जन्म २३ ऑगस्ट १९१८ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या देवगड तालुक्यात धालवली येथे झाला. त्यांचे पाचवीपर्यंतचे शिक्षण देवगडमधील कोर्ले येथे झाले. त्यांचे पुढील शिक्षण कोल्हापूर येथे झाले. अर्थार्जनासाठी त्यांनी अध्यापनाचा पेशा स्वीकारला. रत्नागिरी आणि मुंबईतील विविध महाविद्यालयांमध्ये ते इंग्रजी विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते.
विंदांनी विविधांगी आणि रोचक साहित्यनिर्मिती केली. कोकणच्या मातीत जन्मलेला हा कवी लेखनातून अस्सल कोकणी रंग जपत राहिला. उदा. ‘पिशी मावशी’ कवितेतील भुतांचा उल्लेख. करंदीकरांच्या काव्यकृतींमध्ये स्वेदगंगा, मृद्गंध, ध्रृपद, जातक, अष्टदर्शने आणि विरूपिका यांचा समावेश आहे. ‘आकाशाचा अर्थ’, ‘स्पर्शाची पालवी’ हे करंदीकरांचे ललितनिबंध. मुलांसाठीच्या काव्यकृती म्हणजे अजबखाना, अडमतडम, एकदा काय झाले, एटू लोकांचा देश, परी ग परी, पिशी मावशी आणि तिची भुतावळ, बागुलबोवा, राणीची बाग, सर्कसवाला, सशाचे कान, सात एके सात आदी. त्यांचा ‘परंपरा आणि नवता’ हा समीक्षाग्रंथ तर ‘ए क्रिटिक ऑफ लिटररी व्हॅल्यूज’, ‘लिटरेचर इज व्हायटल आर्ट’ या इंग्रजी समीक्षा प्रसिद्ध आहेत. अॅरिस्टॉटलचे काव्यशास्त्र, फाउस्ट (भाग-1), राजा लिअर हे अनुवाद, तसेच संत ज्ञानदेवांच्या अमृतानुभवाचे अर्वाचीन मराठीत रूपांतरही त्यांनी केले आहे. ‘आदिमाया’ आणि ‘संहिता’ हे निवडक कवितांचे त्यांचे संग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांनी स्वत:च्या कवितांचे इंग्रजीत भाषांतरदेखील केले. अमृतानुभवापासून ते नवकवितेपर्यंत त्यांची प्रतिभा आणि लेखणी लीलया फिरली आहे.
त्यांनी कवितेच्या आशयामध्ये आणि रूपबंधांमध्ये अनेक प्रयोग केले. त्यांनी जबाबदारीच्या भावनेतून मराठीच्या अभ्यासकांसाठी भाषांतरे केली. विंदांची लेखणी वस्तुनिष्ठ नि शब्दनिष्ठ कवितेपेक्षा जाणीवनिष्ठ कवितेचा ध्यास घेणारी आहे. लोकप्रियतेपेक्षा प्रयोगशीलतेची वाट धरणारी आहे. जीवनातील सामान्य अनुभवांकडेही त्यांनी वेगळ्या दृष्टिकोनातून बघितले आणि त्या अनुभवाचे उत्तम साहित्यकृतीत रूपांतर केले. अनुभवांचे दृश्य स्तर खोदून ते आत शिरतात. जे दिसले त्याचा अर्थ लावतात आणि मग जाणवलेले वेगळे काही खोलात दिसलेल्या प्रतीकांच्या माध्यमातून स्वतःच्या स्वतंत्र शैलीत मांडतात. पार्थिव जगण्यात बुडालेली भोवतीची सामान्य माणसे, सामाजिक स्थित्यंतरे, त्यातील धार्मिक-आध्यात्मिक प्रेरणा, विज्ञान, राजकीय विचारप्रणाली या सर्व घटकांविषयीचे प्रगल्भ चिंतन त्यांच्या कवितेतून व्यक्त होते. त्यातून तुकारामांपासून कन्फ्युशिअसपर्यंत, अश्वघोषापासून क्वांटम सिद्धांतापर्यंत अनेक प्रकारच्या वैचारिक दर्शनाचे संस्कार डोकावतात.
ते मराठी वाङ्मयातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी आपल्या साहित्यातून आत्मशोध घेतला. कविवर्य मंगेश पाडगांवकर, वसंत बापट आणि विंदा करंदीकर या ज्येष्ठ कवी त्रिकुटाने महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमध्ये अनेक वर्षे काव्यवाचन केले. कविता वाचणे, ऐकणे आणि समजून घेणे हे त्यांनी या वाचनातून साधले. काव्यवाचनातून मिळणारे मानधन आणि अनेक पुरस्कारांपोटी मिळालेली रक्कम त्यांनी विविध सामाजिक संस्थांना दिली. देकार्त, स्पिनोझा, कान्ट, बर्गसॉ, हेगेल, नित्शे, शोपेनहॉवर हे सात पाश्चात्य तत्त्वज्ञ आणि चार्वाक हे प्राचीन भारतीय दर्शन अशा आठ दर्शनांचे सार कथन करणार्या त्यांच्या ‘अष्टदर्शने’ या काव्यसंग्रहाला ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ मिळाला. एवढेच नाही, तर जनस्थान पुरस्कार, कबीर सन्मान, केशवसुत पुरस्कार, भारतीय भाषा परिषद सह्याद्री पुरस्कार, महाराष्ट्र फाउंडेशन गौरव, महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार, डॉ. लाभसेटवार साहित्य पुरस्कार, साहित्य अकादमी महत्तम सदस्यता, अनेक विद्यापीठांच्या डी. लिट. पदव्या, सोव्हिएत लँड नेहरू लिटररी पुरस्कार आदी अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले होते. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात विंदा तुरुंगातही गेले. स्वातंत्र्य मिळाल्यावर तुरुंगवास भोगलेल्या स्वातंत्र्यसैनिकांना शासनाने निवृत्तिवेतन देऊ केले. परंतु त्यांनी ते नाकारले. अशा या थोर साहित्यिकाचे १४ मार्च २०१० रोजी निधन झाले. त्यांना वंदन!
(संकलित)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment