सरदार उधमसिंग यांनी १३ मार्च १९४० रोजी मायकल ओडवायरची हत्या केली.
१३ एप्रिल १९१९ रोजी जालियनवाला बाग हत्याकांड घडले. त्यामुळे संपूर्ण देशात इंग्रजांविरुद्धचा रोष प्रचंड वाढला. विशेषत: पंजाबच्या तरुणांनी आणि क्रांतिकारकांनी या निर्दयी हत्याकांडाचा बदला घेण्याची शपथ घेतली होती. सरदार उधमसिंग हे यातीलच एक होते. या घटनेने ते इतके संतप्त झाले, की त्यांनी कर्नल रेजिनाल्ड डायर आणि पंजाबचा तत्कालीन गव्हर्नर मायकेल फ्रान्सिस ओडवायर यांना ठार मारण्याची शपथ घेतली. या दोघांनी जालियनवाला बागेत निरपराध नागरिकांवर बेछुट गोळीबाराचा आदेश दिला होता. २१ वर्षांच्या प्रयत्नानंतर १९४०मध्ये १३ मार्च या दिवशी मायकेल ओडवायरची हत्या करून सरदार उधमसिंग यांनी शपथ पूर्ण केली. तोपर्यंत कर्नल रेजिनाल्ड डायरचा मृत्यू झाला होता. ओडवायरच्या हत्येनंतर उधमसिंग यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांनी स्वतःला अटक करवून घेतली. जालियनवाला हत्याकांडानंतर लोकांच्या मनातील रोषाला त्यांनी या बदल्यातून उत्तर दिले.
सरदार उधमसिंग यांचा जन्म २८ डिसेंबर १८९९ रोजी पंजाबमधील संगरूर जिल्ह्यातील सुनम या गावात झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव तहलसिंग आणि आईचे नाव नारायणकौर होते. उधमसिंग यांचे मूळ नाव शेरसिंग होते. त्याच्या जन्मानंतर दोन वर्षांनी त्याच्या आईचे निधन झाले. काही वर्षांनंतर, १९०७मध्ये त्यांच्या वडिलांचेही निधन झाले. यानंतर ते आपल्या भावासोबत एका अनाथाश्रमात राहत होते. तिथे त्यांना उधमसिंग हे नाव पडले. सरदार उधमसिंग यांच्या भावाचे १९१७मध्ये निधन झाले. यानंतर त्यांनी १९१९मध्ये अनाथाश्रम सोडला. त्याच काळात जालियनवाला बाग हत्याकांड घडले आणि त्यातील दोषींना मारण्याचा त्यांनी संकल्प केला. त्यासाठी ते ब्रिटिश भारतीय सैन्यात मजूर म्हणून दाखल झाले आणि परदेशात गेले. परदेश दौऱ्यात सरदार उधमसिंग अनेक देशांमध्ये गेले. फ्रँक ब्राझील, उदयसिंग, उधनसिंग आणि मोहम्मदसिंग आझाद अशी अनेक नावे त्यांनी बदलली. उधमसिंग १९२०च्या सुरुवातीला गदर चळवळीत सहभागी झाले. ते लंडनस्थित वर्कर्स असोसिएशनमध्येही सहभागी झाले. १९२७मध्ये ते भारतात परत आले आणि बंदी असलेल्या साहित्यासह शस्त्रास्त्रांची त्यांनी तस्करी केली. त्याच वर्षी ३० ऑगस्ट रोजी त्यांना अटक करण्यात आली आणि पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.
तुरुंगातील चांगल्या वागणुकीमुळे सरदार उधमसिंग यांची शिक्षा एका वर्षाने कमी करण्यात आली. चार वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर त्यांची सुटका झाली. परंतु तरी पोलिसांची नजर त्यांच्यावर होती. तरीही त्यांनी छुप्या पद्धतीने क्रांतिकारी उपक्रम राबविले. दरम्यान, संधी मिळताच ते १९३३मध्ये जर्मनीला गेले आणि तिथून पुन्हा लंडनला पोहोचले आणि संयम ठेवून योग्य संधी शोधू लागले, जिची ते वर्षानुवर्षे वाट पाहत होते. लंडनमध्ये ते इंडियन वर्कर्स असोसिएशनमध्ये सहभागी झाले.
१३ मार्च १९४० रोजी लंडनमधील रॉयल सेंट्रल एशियन सोसायटीत इस्ट इंडिया असोसिएशनची बैठक सुरू होती. या बैठकीत त्यांनी मायकल ओडवायरवर पाच गोळ्या झाडल्या. त्यात तो जागीच ठार झाला. जालियनवाला बाग हत्याकांड घडले, तेव्हा डायर पंजाबचा तत्कालीन लेफ्टनंट गव्हर्नर होता. जालियनवाला बाग हत्याकांडाचा आदेश देणाऱ्या रेजिनाल्ड डायरचा १९२७मध्ये मृत्यू झाला होता. अशा प्रकारे उधमसिंगांचा संकल्प पूर्ण झाला. सरदार उधमसिंग यांच्यावर मायकल ओडवायरच्या हत्येचा खटला चालवला गेला. तुरुंगात असताना त्यांनी उपोषणही केले. त्यांना केंद्रीय फौजदारी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यांनी न्यायालयात दाखल केलेले अपील फेटाळण्यात आले. भारतमातेचे वीर पुत्र उधमसिंग यांना ३१ जुलै १९४० रोजी लंडनच्या तुरुंगात फासावर लटकवण्यात आले. फाशी दिल्यानंतर सरदार उधमसिंग यांचा मृतदेह तुरुंगात पुरण्यात आला. १९७४मध्ये पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री ग्यानी झैलसिंग यांनी अथक प्रयत्नांनी उधमसिंग यांच्या अस्थी भारतात परत आणल्या. त्यांच्या अस्थिकलशाचे भारतात हुतात्मा म्हणून स्वागत करण्यात आले. दोन ऑगस्ट १९७४ रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. काही अस्थी गंगेत विर्सजित करण्यात आल्या, तर काही अस्थी विविध धर्मीयांकडे दफनविधीसाठी देण्यात आल्या. ते भगतसिंग यांना आदर्श मानत होते. अशा या थोर क्रांतिकारकाला वंदन!
(संकलित)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment