ना. गो. चापेकर

ऐतिहासिक विषयांवर लेखन करणारे मराठीतील एक भाषातज्ज्ञ, संशोधक, लेखक, समीक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते ना. गो. चापेकर यांचा पाच मार्च हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने...

ना. गो. चापेकर मुख्य फोटो
मुख्य फोटो

नारायण गोविंद उर्फ नानासाहेब चापेकर यांचा जन्म पाच ऑगस्ट १८६९ रोजी मुंबईमध्ये झाला. ते ऐतिहासिक विषयांवर लेखन करणारे मराठीतील एक भाषातज्ज्ञ, संशोधक, लेखक, समीक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांनी पैसा, राज्यकारभार, समाज-नियंत्रण यांसारख्या विषयांवर ग्रंथ लिहिले आहेत. चापेकरांचे शालेय शिक्षण रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथे झाले. पुढे एक वर्ष ते पुण्याच्या न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये होते. तेथे त्यांना वा. गो. आपटे, आगरकर, गोखले, गोळे आणि धारप या नामवंत शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. देशाभिमान जागृत होण्यासाठी, बहुश्रुतता येण्यासाठी आणि विचारशक्तीला चालना मिळण्यासाठी हा अल्प काळ त्यांना पोषक ठरला. त्यानंतरचे हायस्कूलमधील शिक्षण त्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये घेतले. १८८७ साली ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांचे महविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या विल्सन कॉलेजमध्ये झाले. तेथे त्यांना स्कॉट, प्रा. गार्डनर आणि प्रा. जिनसीवाले हे नामवंत प्राध्यापक लाभले. १८९१मध्ये ते बीए परीक्षा उत्तीर्ण झाले. मुंबईतून १८९४ साली कायद्याची पदवी घेतल्यानंतर त्यांनी काही काळ वकिली केली आणि मग ते न्यायखात्यात नोकरी करू लागले. 

पंचवीस वर्षे न्यायाखात्यात काम करत असताना त्यांना तत्कालीन मुंबई इलाख्यात अनेक ठिकाणी भ्रमंती करावी लागली. ते १९२५ साली प्रथम वर्ग न्यायाधीश म्हणून निवृत्त झाले. त्यानंतर ते औंध संस्थानाचे मुख्य न्यायाधीश झाले. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी औंध संस्थानातील न्यायव्यवस्थेत अनेक सुधार घडवले. ना. गो. चापेकर यांनी कार्यकुशल आणि नि:स्पृह न्यायाधीश म्हणून ख्याती मिळवली. ते १९२५ मध्ये ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे वास्तव्याला गेले. बडोद्याला १९३४मध्ये भरलेल्या विसाव्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. ‘वाङ्मय ही समाजाची नाडी आहे. कोणत्याही समाजाच्या वाङ्मयीन स्वरूपावरून तो समाज संस्कृतीच्या कोणत्या पायरीवर आहे हे समजते,’असे विचार त्यांनी अध्यक्षपदावरून मांडले. 

चापेकरांनी साहित्य व संस्कृती या क्षेत्रांत लक्षणीय स्वरूपाचे कार्य केले. ते कुशल संघटक होते. त्यांनी सेवानिवृत्तीनंतरच्या काळात ‘भारत इतिहास संशोधक मंडळ’, ‘मराठी ग्रंथोत्तेजक सभा’, ‘राजवाडे संशोधन मंडळ’, ‘धर्मनिर्णय मंडळ’ आदी अनेक संस्थांमधून काम केले. अनेक नव्या-जुन्या साहित्यिकांना एकत्र आणून त्यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेला ऊर्जितावस्थेला आणले. पुणे विद्यापीठातून पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करत. 

ना. गो. चापेकर यांना पुणे विद्यापीठाकडून १९६६मध्ये डी. लिट. ही सन्माननीय पदवी देण्यात आली. त्यांचे बरेचसे लेखन निवृत्तीनंतरच झाले. त्यांचे सुमारे वीस ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. त्यांपैकी बदलापूरची सामाजिकदृष्ट्या संपूर्ण पाहणी करणारा 'बदलापूर (आमचा गांव)...' हा १९३३मध्ये प्रसिद्ध झालेला ग्रंथ विशेष गाजला. चित्पावन (१९३८) आणि चापेकर (१९४०) हे ग्रंथही असेच सामाजिक संशोधनात्मक म्हणता येतील. पेशवाईच्या सावलीत (१९३७) हा ग्रंथ सामाजिक इतिहाससंशोधन म्हणून मान्यता पावला. वैदिक वाङ्मयाविषयीचे चिंतन व शोधन हा त्यांच्या विचाराचा आणखी एक विषय. वैदिक निबंध (१९२९) व तर्पण (१९४८) हे त्यांचे वैचारिक ग्रंथ होते. याशिवाय एडमंड बर्कचे चरित्र, जीवनकथा (१९४३) हे आत्मचरित्र, हिमालयात (१९४१) आणि काश्मीर (१९४६) यांसारखी प्रवासवर्णने, साहित्यसमीक्षात्मक लेख अशा विविध स्वरूपाचे लेखन त्यांनी केले आहे. पैसा, राज्यकारभार, समाज-नियंत्रण यांसारख्या विषयांवरही त्यांनी ग्रंथ लिहिले असून, ते त्यांच्या चौफेर विचारांचे द्योतक आहेत. गच्चीवरील गप्पा (१९२६) आणि रजःकण (१९४३) हे त्यांचे स्फुट लेखसंग्रह. ‘मराठी ग्रंथरचना करण्याचा उद्देश मनात धरला म्हणजे विषयाध्यायन विशेष काळजीपूर्वक करावे लागते व फुरसतीचा काळ आळशीपणात न घालवता योग्य कामाकडे खर्च होऊन लेखकाची स्वत:ची मन:संस्कृती तयार होते,’ असा आपला लेखनविषयक दृष्टिकोन त्यांनी व्यक्त केलेला आहे. पाच मार्च १९६८ रोजी बदलापूर येथे ना. गो. चापेकर यांचे निधन झाले. 

(संकलित)

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 05-03-2026 News publication date | Time: 05:55 AM News publication time | Views: 17 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 05-03-2026 News publication date | Time: 05:55 AM News publication time | Views: 17 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words