चार मार्च हा दिवस राष्ट्रीय सुरक्षा दिन म्हणून साजरा केला जातो. त्याविषयी...
चार मार्च हा दिवस राष्ट्रीय सुरक्षा दिन म्हणून साजरा होतो. त्याची सुरुवात औद्योगिक सुरक्षिततेसाठी स्थापन झालेल्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेपासून झाली. याच निमित्ताने चार ते ११ मार्चदरम्यान औद्योगिक सुरक्षा सप्ताह साजरा केला जातो. कारखान्यात होणारे अपघात टाळण्याच्या दृष्टीने व कामगारांमध्ये, व्यवस्थापनामध्ये सुरक्षिततेची जाणीव निर्माण करण्यासाठी या सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. औद्योगिक सुरक्षेमध्ये कामगार हा केंद्रस्थानी आहे. उत्पादन प्रक्रियेत त्याचा सिंहाचा वाटा असतो. सुरक्षितता एका दिवसाची नसून ३६५ दिवस २४ तास अविश्रांत चालणारे संपूर्ण चक्र सुरक्षितता राखून चालवायचे असते. कारखान्यातला प्रत्येक कामगार सुरक्षित राहावा म्हणून व्यवस्थापनाने अनेक गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते. कामगाराच्या सुरक्षिततेची, आरोग्याची आणि कार्यस्थळी सकारात्मक वातावरण राखण्याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या सप्ताहाची प्रमुख उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत :
• जागरूकता निर्माण करणे : औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना सुरक्षिततेचे महत्त्व पटवून देणे.
• शून्य अपघात : कामाच्या ठिकाणी होणारे अपघात टाळून 'शून्य अपघात' हे ध्येय साध्य करणे.
• नियम व साधनांची माहिती : सुरक्षा नियमांची आणि हेल्मेट, ग्लोव्ह्ज यांसारख्या सुरक्षा साधनांची माहिती कामगारांपर्यंत पोहोचवणे.
• आर्थिक व जीवितहानी रोखणे : अपघातांमुळे होणारे मानवी दुःख आणि आर्थिक नुकसान कमी करणे.
याशिवाय औद्योगिक सुरक्षेसाठी जनजागृती व्हावी म्हणून खालील उद्दिष्टे निर्धारित केली आहेत. ती खालीलप्रमाणे -
• सुरक्षितता, आरोग्य आणि पर्यावरण चळवळ देशाच्या विविध भागांपर्यंत पोहोचविणे.
• विविध औद्योगिक क्षेत्रांतील प्रमुख घटकांचा विविध स्तरांवर सक्रिय सहभाग सुनिश्चित करणे.
• कंपनीच्या व्यवस्थापनांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना सुरक्षा उपक्रमांमध्ये सहभागी करून घेणे आणि कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देणे.
• कार्यस्थळी गरजेनुसार उपक्रमांची निर्मिती, कायदेशीर तरतुदींचे पालन आणि व्यावसायिक व्यवस्थापन प्रणालींच्या विकासाला प्रोत्साहित करणे.
• जी क्षेत्रे अद्याप कायद्याच्या कक्षेत आलेली नाहीत, त्यांना या चळवळीत सहभागी करून घेणे.
• कार्यस्थळ अधिक सुरक्षित बनविण्यासाठी व्यवस्थापन, कर्मचारी आणि संबंधित घटक यांना त्यांच्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देणे.
वरील सर्व उद्दिष्टे ही कार्यस्थळी सुरक्षितता, आरोग्य आणि पर्यावरण संस्कृती निर्माण व दृढ करण्याच्या तसेच ती कार्यसंस्कृतीशी एकरूप करण्याच्या व्यापक ध्येयाचा भाग आहेत.
सुरक्षेचे महत्त्वाचे उपाय खालीलप्रमाणे आहेत :
१. कामगारांना कामाचे सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे.
२. कामाच्या ठिकाणी यंत्रसामग्रीची नियमित तपासणी करणे.
३. वैयक्तिक संरक्षक उपकरणे वापरणे अनिवार्य करणे.
४. आणीबाणीच्या प्रसंगी (उदा. आग लागल्यास) काय करावे, याचे प्रशिक्षण देणे.
औद्योगिक सुरक्षा दिनानिमित्त अनेक उपक्रम घेतले जातात.
• सार्वजनिक कार्यक्रम, परिसंवाद, चर्चासत्रे व वादविवादांचे आयोजन, तसेच आवाहने व संदेश प्रसिद्ध करणे.
• सुरक्षितता, आरोग्य आणि पर्यावरण विषयक लघुपट/दृकश्राव्य चित्रफितींचे प्रकाशन.
• केंद्रीय कामगारमंत्र्यांचा, तसेच कामगार मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग - राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष व वरिष्ठ अधिकारी, उद्योग क्षेत्रातील वरिष्ठ कार्यकारी अधिकारी, राष्ट्रीय स्तरावरील कामगार संघटनांचे नेते, तसेच संस्था/स्वयंसेवी संस्थांतील मान्यवर व्यक्ती आणि सर्वसामान्य जनतेचा सक्रिय सहभाग.
• आठवडाभर आयोजित महत्त्वपूर्ण कार्यक्रम व उपक्रमांना दूरदर्शनच्या राष्ट्रीय नेटवर्क व प्रादेशिक केंद्रांद्वारे, आकाशवाणी केंद्रांद्वारे, तसेच राष्ट्रीय व प्रादेशिक वृत्तपत्रांद्वारे व्यापक प्रसिद्धी देणे.
(संकलित)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment