जागतिक वन्यजीव दिन

तीन मार्चच्या जागतिक वन्यजीव दिनानिमित्त विशेष लेख

जागतिक वन्यजीव दिन मुख्य फोटो
मुख्य फोटो

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे! संत तुकाराम महाराजांनी समस्त सजीवांना आपले सोयरे म्हटले आहे. आपली भारतीय संस्कृती ‘वसुधैव कुटुंबकम्’ या संकल्पनेवर आधारलेली आहे. म्हणजे फक्त मानवजातच नाही, तर पृथ्वीवरील सर्व सजीव हे आपले कुटुंब आहे, असेच आपण मानतो. हे खरेच आहे. आपली पृथ्वी फक्त मानवांसाठी नाही, तर ती अवघ्या सजीवांसाठी आहे. असे म्हणतात, की मनुष्यजन्म हा ८४ लाख जन्म झाल्यावर प्राप्त होतो. या विचारानुसार पृथ्वीवर ८४ लाख प्रकारचे सजीव आहेत. त्यातील काही जलचर, भूचर, उभयचर, तर काही वायुचर आहेत. काही हत्तीसारखे महाकाय आहेत, तर काही मुंगीपेक्षाही सूक्ष्म आहेत. सजीवांचे असे कितीतरी प्रकार असले तरी प्रत्येक वन्यजीवाचे अन्नसाखळीतील महत्त्व तितकेच अधोरखित केलेले आहे. मनुष्य म्हणून आपण सर्वोच्च स्थानी असलो, तरी या साखळीतील एक जरी कडी विस्कटली तरी संपूर्ण सजीवसृष्टीचा समतोल ढासळेल. वन्यजीवांचे स्थान अबाधित राहिले तरच पृथ्वीचे अस्तित्व राहणार आहे.

दर वर्षी तीन मार्च रोजी साजरा केला जाणारा जागतिक वन्यजीव दिन हा केवळ एक दिवस नसून, तो निसर्ग आणि मानव यांच्यातील नाते अधिक सशक्त करण्याचा, जैवविविधतेचे महत्त्व अधोरेखित करण्याचा आणि संकटात सापडलेल्या प्रजातींना वाचवण्यासाठी संयुक्त कृती करण्याचा जागतिक दिवस आहे. जागतिक वन्यजीवदिनाची मुहूर्तमेढ २०१३मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने या दिवशी रोवली आणि १९७३ मध्ये या दिवशीच CITES अर्थात ‘धोक्यात आलेल्या प्रजातींच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराविरुद्धच्या करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती. म्हणून यासाठी तीन मार्च हा दिवस निवडण्यात आला. हा करार वन्यप्राणी आणि वनस्पतींच्या अवैध व्यापाराला आळा घालण्यासाठी ऐतिहासिक मानला जातो. आज हा करार १८०हून अधिक देशांनी स्वीकारलेला असून, लाखो प्रजातींच्या संरक्षणात तो महत्त्वाची भूमिका बजावत आहे. वन्यजीव आणि वनस्पती केवळ सौंदर्याचा भाग नसून, पृथ्वीवरील जैविक साखळीचे ते अत्यावश्यक घटक आहेत. अन्नसाखळी संतुलित ठेवणे, वातावरणातील ऑक्सिजन-कार्बनचे प्रमाण नियंत्रित करणे, मातीची सुपीकता टिकवणे, जलचक्र सुरळीत ठेवणे आणि मानवी आरोग्यासाठी आवश्यक औषधी वनस्पती पुरवणे, अशी महत्त्वाची कामगिरी ही जैवविविधता करत असते; मात्र गेल्या काही दशकांमध्ये मानवाने केलेली अमर्याद जंगलतोड, औद्योगिक प्रदूषण, अनियंत्रित नागरीकरण, हवामानबदल आणि बेकायदेशीर शिकार यामुळे हजारो प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. अनेक प्राणी आणि पक्षी आज नामशेष झाले असून अनेक धोक्याच्या यादीत आहेत. 

जागतिक वन्यजीव दिन आपल्याला वैयक्तिक जबाबदारीची जाणीव करून देतो. प्लास्टिकचा वापर टाळणे, झाडे लावणे, पर्यावरणपूरक वस्तू वापरणे, अवैध वन्यजीव व्यापाराविरोधात आवाज उठवणे आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा शाश्वत वापर करणे, ही काही सोपी, पण प्रभावी पावले आपण उचलू शकतो. पृथ्वी ही केवळ आपली नसून येणाऱ्या पिढ्यांचीही आहे, या जाणिवेने आपण निसर्गाशी सुसंवाद साधला पाहिजे. थोडक्यात सांगायचे झाले, तर जागतिक वन्यजीव दिन हा एक उत्सव नसून तो एक इशारा आहे – निसर्गाचे संरक्षण हा पर्याय नसून अपरिहार्य जबाबदारी आहे. आपण आज जागरूक झालो नाही, तर उद्या केवळ पश्चात्ताप करावा लागेल. वन्यजीवांचे संरक्षण म्हणजे प्रत्यक्षात मानवजातीचेच संरक्षण आहे. सर्व मानव प्रजात आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी वन्यजीव आणि जैवविविधतेवर आधारित साधनसंपत्तीवर अवलंबून आहे - अन्नापासून ते इंधन, औषधे, निवारा आणि कपड्यांपर्यंत! जागतिक वन्यजीव दिन ही वन्यजीव आणि वनस्पतींच्या अनेक सुंदर आणि वैविध्यपूर्ण प्रकारांचा उत्सव साजरा करण्याची, त्यांच्या अनेक फायद्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्याची आणि वन्यजीव गुन्ह्यांविरुद्ध लढण्याची संधी आहे, ज्याचे व्यापक आर्थिक, पर्यावरणीय आणि सामाजिक परिणाम होतात. तेव्हा चला,आजच्या या जागतिक वन्यजीव दिनानिमित्त आपण एक संकल्प करू या, ही पृथ्वी आणि तिच्यावर वावरणारे आणि जगणारे सर्व सजीव यांच्या अस्तित्वासाठी आपण सारे एक होऊन लढू या. कारण ही पृथ्वी फक्त मानवासाठी मुळीच नाही, मानवाआधीही सजीवसृष्टी होती, आताही आहे आणि मानवानंतरही ती राहणार आहे!! हे सारे वन्यजीव जगले तरच आपण राहणार आहोत!

(संकलित)

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 03-03-2026 News publication date | Time: 06:55 AM News publication time | Views: 17 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 03-03-2026 News publication date | Time: 06:55 AM News publication time | Views: 17 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words