विदर्भातील सहानगड - इतिहास आणि निसर्ग यांचा मोहक संगम असलेले ठिकाण

भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील किल्ला

विदर्भातील सहानगड - इतिहास आणि निसर्ग यांचा मोहक संगम असलेले ठिकाण मुख्य फोटो
विदर्भातील सहानगड - इतिहास आणि निसर्ग यांचा मोहक संगम असलेले ठिकाण अतिरिक्त फोटो

विदर्भाच्या हिरव्यागार भूमीत, भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यात सानगडी गावाच्या कुशीत दिमाखात उभा आहे सहानगड. लहानसा असला तरी इतिहासाची साक्ष देणारा हा गड निसर्गाच्या सहवासात आजही अभिमानाने ताठ उभा आहे. साकोलीपासून अवघ्या १७ किलोमीटर अंतरावर, साकोली–वडसा मार्गावरून जाताना दूरवर दिसणारी त्याची टेकडी मन मोहून टाकते. उंचीवर पोहोचल्यावर पसरलेली हिरवी शेती, मंद वाऱ्याची साद आणि गावकुसाची निरागसता मनाला स्पर्शून जाते. शांतता, निसर्ग आणि इतिहास यांचा सुंदर संगम अनुभवायचा असेल, तर सहानगड हे एक उत्तम ठिकाण आहे. ‘सान’ म्हणजे लहान आणि ‘गढी’ म्हणजे गड - या छोट्याशा किल्ल्यामुळेच सानगडी गावाला नाव मिळाले आणि त्याच नावाला इतिहासाची श्रीमंती देणाराणारा हा सहानगड आजही शांतपणे उभा आहे. 

इ. स. १७३४मध्ये नागपूरचे रघूजीराजे भोसले यांनी उंच टेकडीवर हा गढीवजा किल्ला उभारला. त्या काळी सानगडी हे तालुक्यातील महत्त्वाचे ठिकाण होते. म्हणूनच या भूमीवर संरक्षणासाठी उभारलेली ही गढी आज भोसलेकालीन वैभवाची साक्ष देत आहे. किल्ल्याचा भक्कम दरवाजा अजूनही सुस्थितीत आहे. दरवाज्यातील देवड्या, पहारेकऱ्यांसाठीची जागा आणि आतील कोठार त्या काळातील रचनाशैलीची झलक दाखवतात. कोरीव शिल्प नसले, तरी साधेपणात दडलेली ताकद येथे जाणवते. आयताकृती रचनेचा हा गड सुमारे दीड एकर परिसरात पसरलेला आहे. मध्यभागी असलेल्या बुरुजावरून संपूर्ण किल्ला आणि दूरवरचा परिसर नजरेत सामावतो. तटबंदीची काहीशी पडझड झालेली असली, तरी येथे उभी असलेली अष्टधातूंची तोफ इतिहासाची साक्षीदार आहे. निसर्ग, इतिहास आणि शांततेचा संगम अनुभवायचा असेल, तर सहानगड हे एक उत्तम ठिकाण आहे. सानगडीमध्ये पाऊल टाकताच इतिहास जिवंत झाल्याचा भास होतो. भव्य परकोट, तटबंदी, पडझड झालेले बुरूज, बाहुली विहीर आणि शांतपणे उभी असलेली तोफ हे सारे भूतकाळाचे निःशब्द साक्षीदार आजही अभिमानाने उभे आहेत. 

या किल्ल्यावर शिव मंदिर, भवानी माता मंदिर आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ मूर्ती बसवली असून, दर वर्षी १९ फेब्रुवारी म्हणजेच छत्रपती शिवरायांची जयंती येथे दिमाखात साजरी होते. या वारशाचे जतन व्हावे म्हणून गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन परिसरात वृक्षारोपण करून गडाला हिरवाईची नवी शाल चढवली आहे. गावातील २१ हनुमान मंदिरे, विठ्ठल-रुक्मिणी, लक्ष्मीनारायण मंदिर आणि रामदास स्वामींचा मठ श्रद्धेचे तेज पसरवतात. शिवाय सिवनीच्या दिवाण कुटुंबाने बांधलेल्या जुन्या किल्ल्याचे अवशेषही येथे इतिहासाची गूढ कहाणी सांगताना दिसतात. दगडांच्या भक्कम पायावर आणि विटांच्या उंच बांधकामावर उभा असलेला सहानगड आज भग्नावस्थेत असला, तरी त्याच्या तटबंदीवरून वैभवाची कल्पना येते. त्याचा काही भाग गोलाकार वळण घेत उभा आहे, तर मधोमध १०–१२ मीटर व्यासाचे तोफ फिरविण्याचे गोल स्थान आजही दिसते - जणू रणशिंग फुंकण्यास सज्ज! प्रवेशद्वारासमोरील चौकोनी, छतविरहित रचना म्हणजेच पूर्वीचा रंगमहाल - आज अवशेषांतूनही ऐश्वर्याची चाहूल देतो. उत्तर-पूर्व व दक्षिणेकडील द्वारांतून गडाचा विस्तार जाणवतो. परिसरातील पाच विहिरी आता झाडाझुडपांत दडल्या असल्या, तरी त्या या भूमीच्या जिवंत इतिहासाच्या साक्षीदार आहेत. 

सानगडीतील दोन प्राचीन बाहुली विहिरी म्हणजे केवळ जलस्रोत नाहीत, तर दगड-चुन्यात साकारलेली स्थापत्यकलेची अप्रतिम देणगी आहेत. सुमारे ५०–६० पायऱ्यांनी खोल उतरत जाताना इतिहासाची थंड सावली स्पर्शून जाते. आतील प्रशस्त खोल्या पाहिल्यावर भोसलेकालीन सैनिकांच्या मुक्कामाची, गुप्त सल्लामसलतींचे अंदाज आपण बांधू शकतो. वर्षभर उपलब्ध असलेले थंडगार पाणी या विहिरींचे जीवनस्रोत होते. आज त्यांचा वापर कमी झाला, एक विहीर बुजलीही; तरी उरलेली बावडी अजूनही भूतकाळाचे रहस्य कुजबुजत उभी आहे.  

इ. स. १७०० च्या सुमारास बख्त बुलंदशहांनी सानगडी ते प्रतापगड आणि तिरोडा ते आंबागडपर्यंतचा विस्तीर्ण प्रदेश आपल्या आधिपत्याखाली घेतला. पुढे रघूजीराजे भोसले यांनी वलीशहाचा पराभव करून राज्य राणी रतनकुंवरला परत दिले. कृतज्ञतेपोटी राणीने नागपूर आणि भंडारा हे प्रांत भेटस्वरूपात भोसल्यांना अर्पण केले. तेव्हाच भंडारा ‘वैनगंगा प्रांत’ म्हणून ओळखला जाऊ लागला. श्रीमंत रघूजीराजे भोसले यांचे वंशज श्रीमंत अप्पासाहेब भोसले यांचे येथे देहावसान झाले, तर किल्ल्याच्या आवारात वलीखान यांची समाधी आणि एक जुनी विहीर दिसते. सहानगडाच्या बुरुजावर विसावलेली व्याघ्रमुखी अष्टधातूंची भव्य तोफ आजही थक्क करून सोडते. सुमारे ११ फूट लांबी, पाच फूट व्यास आणि पाच कड्यांनी सजलेली ही तोफ जणू रणगर्जनेची स्मृती जपून आहे. जवळच पडलेला १०–१२ किलोचा लोखंडी गोळा तिच्या सामर्थ्याची साक्ष देतो. इंग्रजांनी, अगदी भोसल्यांनीही शेकडो बैलजोड्या व हत्ती लावून तिला हलवण्याचा प्रयत्न केला; पण ही तोफ जागची हलली नाही. त्यामुळेच लोककथांनी तिला ‘तोफमाय’ किंवा ‘तोफेश्वरी देवी’चे रूप दिले. आज ती केवळ शस्त्र नाही, तर पराक्रम आणि श्रद्धेचा संगम बनली आहे. 

सानगडीतील दोन भोसलेकालीन बाहुली विहिरी म्हणजे दगडांत कोरलेले जिवंत इतिहासपान. फक्त दगडांनी बांधलेल्या या पायरीवजा विहिरीत ५०–६० पायऱ्या उतरल्यावर आत मोठ्या खोल्या दिसतात - जिथे युद्धकाळात मुक्काम, गुप्त खलबते घडत असावीत. पुढे खोल गर्तेत वर्षभर थंडगार पाणी नांदते. आज एक विहीर बुजली आहे, तर जुनी अष्टकोनी विहीर झाडाझुडपांत हरवलेली आहे. तरीही या बावड्या शांतपणे भूतकाळाची कुजबुज जपत उभ्या आहेत. पारतंत्र्याच्या काळात सानगडी हे स्वातंत्र्य चळवळीचे जाज्ज्वल्य केंद्र होते. देशभक्तीच्या प्रेरणेने पेटलेल्या असंख्य वीरांनी येथे इंग्रजांविरुद्ध लढा दिला. १४ ऑगस्ट १९४७च्या मध्यरात्री, भारत स्वतंत्र होताच सहानगडाच्या तटावर जगन्नाथ गोल्लीवार, सोमाजी बोकडे आणि गावकऱ्यांनी अभिमानाने तिरंगा फडकवला. त्या क्षणी गडाच्या दगडांनीही स्वातंत्र्याची गर्जना ऐकली. सहानगडाचा परिसर निसर्गरम्य... हिरवी टेकडी, नजीकचा शांत मामा तलाव आणि इतिहासाची साक्ष देणारे तट. पर्यटक आणि भाविक येथे वारंवार येतात. शेजारी मामा तलाव असल्यामुळे स्थलांतरी पक्षी येथे येतात. त्यांना बघण्यासाठी पर्यटक, तसेच पक्षीप्रेमींची गर्दी उसळत असते. परंतु या सौंदर्याला काळी छाया पडते आहे. परिसरात अस्वच्छता पसरते आहे. येथे मद्यपान केले जाते आणि कचऱ्याचे ढीग वारशाला विद्रूप करतात. जतनाची गरज अधोरेखित करण्यासाठी स्थानिकांनी सामाजिक माध्यमांतून आवाज उठवला; तरीही अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही.

निसर्ग, इतिहास आणि रोमांच यांचा एकत्रित अनुभव घ्यायचा असेल, तर सहानगड हे नेमके ठिकाण आहे! टेकडीवर उभा असलेला हा किल्ला चढताना प्रत्येक पावलागणिक उत्सुकता वाढते आणि वर पोहोचल्यावर दिसणारा निसर्गमय नजारा अक्षरशः थक्क करून सोडतो. भव्य तटबंदी, जुने बुरुज, ऐतिहासिक तोफ, गूढ बाहुली विहिरी, बाजूला असलेला मामा तलाव - पाहण्यास, अनुभवण्यास येथे खूप काही आहे. इतिहासप्रेमींसाठी हा जिवंत धडा आहे, तर भटकंती आवडणाऱ्यांसाठी एक सुंदर ट्रेकिंग स्पॉट. कुटुंब, मित्रमंडळी किंवा विद्यार्थ्यांसोबत एक दिवस सहानगडावर घालवला, तर तो संस्मरणीय ठरल्याशिवाय राहणार नाही. एकदा तरी या गडावर या - आणि स्वतः अनुभव घ्या... सहानगड खरोखरच जबरदस्त पर्यटनस्थळ आहे, याची तुम्हाला जाणीव होईल.


Publisher: Omkar Hardas News publisher name | Date: 19-02-2026 News publication date | Time: 12:20 PM News publication time | Views: 52 Number of times this news has been viewed | District: bhandara Related district of the news
Publisher: Omkar Hardas News publisher name | Date: 19-02-2026 News publication date | Time: 12:20 PM News publication time | Views: 52 Number of times this news has been viewed | District: bhandara Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words