अहिल्यानगरमधील नेवासा तालुक्यातील ऐतिहासिक, पौराणिक वारसास्थळ
प्रवरा आणि गोदावरी यांचा संगम असलेले प्रवरा संगम!
मूळ नाव कायगाव टोक. याबद्दलची पौराणिक कथा अशी, की मारीच राक्षसाचा प्रभू रामचंद्रांनी वध केल्यावर जिथे त्याचे शरीर पडले ते कायगाव आणि डोके पडले ते टोक. येथे शंकराचे पेशवेकालीन अप्रतिम मंदिर आहे ते म्हणजे सिद्धेश्वर मंदिर. प्रवरा आणि गोदावरी परिसरात नेवासा क्षेत्रात अनेक शिवमंदिरे आहेत. याच ठिकाणी पलीकडच्या तीरावर घटेश्वर मंदिर आहे. जम्मूहून एक तपस्वी महापुरुष १९७६ साली येथे आले आणि त्यांनी या कार्यक्षेत्राला आपली कर्मभूमी मानून आपल्या आध्यात्मिक शक्तीचा जागर केला.
आज ते ब्रह्मलीन झाले आहेत. त्यांची समाधी त्यांच्या भक्तांच्या प्रयत्नातून उभी राहिली आहे. शिवरात्रीच्या संध्याकाळी तेथे यात्रा महोत्सव असतो. बाबाजींनी तेथे गंगा आरती सुरू केली.
हे मंदिर पेशवेकालीन असले, तरी त्याची पार्श्वभूमी रामायणकालीन आहे. श्रीराम चित्रकूट येथून पंचवटीकडे जाताना येथेच गंगेच्या किनारी प्रभूंच्या पदस्पर्शाने ही भूमी पवित्र झाली आहे, अशी आख्यायिका आहे.
येथे महाशिवरात्रीला आलेल्या भाविकांची श्रद्धा आणि भाव बघून भारताच्या सनातन राष्ट्राच्या पाऊलखुणा पदोपदी सर्वत्र जाणवत होत्या. असे असतानाही, जेव्हा हे राष्ट्र एक नव्हते असे सांगितले जाते, तेव्हा उत्तरेतील गंगा दक्षिणेतील गोदावरीशी जोडणारा प्रभू रामचंद्रांचा पौराणिक इतिहास एक विलक्षण अनुभूती देतो.
चित्रकूट येथेही गुप्त गोदावरी स्थान आहे. असे म्हणतात, की गोदावरी तेथे लुप्त झाली आणि त्र्यंबकेश्वर येथे प्रकट झाली. हा इतिहास केवळ पौराणिक नाही, तर भूगोल आणि अध्यात्मही आहे.
आमचे सनातन राष्ट्र आणि त्याच्या सनातन परंपरा, संस्कृती अभेद्य आहेत.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment