वर्धा : ‘अमृत मेळावा’ – विद्यार्थी, युवक, युवती व उद्योजक यांच्या सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शन
वर्धा – आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील युवक-युवती तसेच नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने स्थापन करण्यात आलेली स्वायत्त संस्था महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) विविध उपक्रम राबवत असून, या योजनांच्या माध्यमातून आर्थिक व सर्वांगीण विकासाचे दरवाजे खुले होत आहेत. त्यामुळे सर्वांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमृतपेठचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अमोल चव्हाण यांनी केले.
रविवार, दि. १४ सप्टेंबर रोजी वर्धा येथील माहेश्वरी भवन येथे भव्य ‘अमृत मेळावा’ पार पडला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी श्री. अमोल चव्हाण तर प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय व्यवस्थापक श्री. देवदत्त पंडित व विभागीय उपव्यवस्थापक श्री. विक्रम पांडे उपस्थित होते.
मंचावर ब्राह्मण सभेचे अध्यक्ष श्री. विलासराव कुलकर्णी, सचिव श्री. महेश देशपांडे, माहेश्वरी मंडळाचे अध्यक्ष श्री. विजयराव राठी व सचिव श्री. धर्मेंद्रजी मुंदडा यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात भारतमाता प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर विभागीय व्यवस्थापक श्री. देवदत्त पंडित यांनी अमृत संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक योजना, कौशल्य विकास उपक्रम तसेच उद्योग उभारणीसाठीचे विविध प्रकल्प यांची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली.
यानंतर श्री. अमोल चव्हाण यांनी ‘अमृतपेठ’ या नव्या उपक्रमाची माहिती देत सांगितले की, हे एक अत्याधुनिक खरेदी-विक्री दालन असून स्थानिक उत्पादक व उद्योजकांना त्यांच्या उत्पादनांना थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे.
या मेळाव्यास ब्राह्मण, माहेश्वरी, अग्रवाल, गुजराती, कोमटी, राजपूत, ठाकूर, पाटीदार, राजपुरोहित, सिंधी आदी खुल्या प्रवर्गातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजातील मान्यवरांनी अमृतच्या उपक्रमांचे स्वागत करत युवक-युवतींना या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. मनोज मोहता यांनी उत्साहपूर्णरीत्या केले, तर आभारप्रदर्शन जिल्हा व्यवस्थापक श्री. ऋषिकेश खराटे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ब्राह्मण सभा अध्यक्ष श्री विलासराव कुलकर्णी, माहेश्वरी मंडळ सचिव धर्मेंद्र जी मुंदडा,अमृत मित्र श्री. धीरज राठी व संगणक सखी कु. वैष्णवी जामनकर यांनी विशेष परिश्रम घेतले.