स्वप्न असावे स्वप्नासारखे
नको कल्पना नुसती
भव्य दिव्य आव्हान असावे
नको पेंगुळी सुस्ती
त्या स्वप्नाला पंख असावे
गगनी स्वैर फिराया
संघर्षाचे बळ असावे
घेण्या उंच भराऱ्या
संघर्ष असावा सिंहासारखा
भातुकलीचा खेळ नको
परिश्रमाची हार चालु दे
विनाश्रमाची जीत नको
स्वकष्टाने यश मिळावे
नको फुकटची सिद्धी
चार सोयरे मित्र असावे
नको क्षणिक प्रसिध्दी
सातत्याची धार असावी
क्षणभंगुरशी लाट नको
कर्मावर विश्वास असावा
नशीबाची तक्रार नको
ध्येयाला त्या वाहून घ्यावे
नको निरर्थक कर्म
आयुष्याला अर्थ मिळावा
व्यर्थ न व्हावा जन्म!!