२०१५ साली इंग्लंडमध्ये “द मॅन हू न्यू इन्फिनिटी” हा चित्रपट प्रदर्शित झाला. प्रख्यात भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट होता. असामान्य गणिती प्रतिभेचं देणं लाभलेला हा भारतीय युवक आणि त्याच्या दुर्दैवी आयुष्याभोवती गुंफलेली त्याची चित्तवेधक कहाणी त्या चित्रपटामध्ये अगदी यथार्थपणे रंगवली होती. रामानुजनला “शापित यक्ष” का म्हणतात, हे तो चित्रपट पाहिला म्हणजे लगेच समजून येते.
श्रीनिवास रामानुजन चा जन्म 22 डिसेंबर 1887 रोजी इंग्रज शासित भारतातील मद्रास प्रांतात झाला. लहानपणापासूनच त्याला गणितामध्ये असामान्य गती दिसायला लागली होती. गणितामध्ये कुठलेही औपचारिक उच्च शिक्षण न घेताही रामानुजन ने घरबसल्या गणिता मधली कित्येक अवघड समीकरणे आणि प्रमेये सोडवून टाकली होती. कित्येक समीकरणे आणि प्रमेये तर त्याने स्वतःच्या प्रतिभेतून विकसित केलेली होती. परंतु त्या काळातील भारतीय समाजात या हिऱ्याचं महत्व ओळखणारा पारखी मिळणं थोडं अवघड होतं. जिथे रोजचं जगणं हेच युनियन जॅकच्या दुष्ट छायेखाली नासत होतं, तिथे गणित आणि विज्ञान समजून घेणारे विद्वान तयार होणं किती अवघड असेल याची कल्पनाच केलेली बरी. त्यामुळे रामानुजन ने स्थानिक कलेक्टरच्या सूचनेनुसार तत्कालीन विख्यात जागतिक दर्जाचे गणितज्ञ सर हार्डी यांना पत्र पाठवलं आणि प्रोसेसर हार्डी यांनी रामानुजनला इंग्लंडला बोलावून घेतलं. पुढे प्रोफेसर हार्डी आणि श्रीनिवास रामानुजन यांच्यात बरंच एकत्रित संशोधन होतं आणि गणिताच्या इतिहासात नवनवे अध्याय रचले जातात. बरीच साधीसरळ आणि हॅप्पी एंडिंग वाटेल अशी ही गोष्ट. पण ही गोष्ट वाटते तितकी नाकासमोर सरळ रेषेत घडलेली नाही. थोडं बारकाईने बघितलं तर या कहाणीच्या रेसिपी मध्ये कित्येक कडाक्याचे वाद, तत्वज्ञान विषयक चर्चा, विचारधारा आणि श्रद्धा यांबाबत पराकोटीचे मतभेद आणि कित्येक वर्षांचे चिंतन मंथन यांची खमंग फोडणी दिसून येते !
श्रीनिवास रामानुजन याने लहानपणापासून आपल्या अद्वितीय प्रतिभेने जे काही गणिती शोध लावले, त्याचं श्रेय त्याने स्वतः कधीच न घेता कायम आपली कुलदेवता नम्मगिरी देवी हिला दिलं. रामानुजन म्हणायचा, माझी देवीच मला गणिताचे सिद्धांत सांगते. कुणी म्हणेल हे कसे शक्य आहे. पण ज्याला आपण आजकाल सिक्स्थ सेन्स किंवा अंतर्ज्ञान म्हणतो, अशा प्रकारचं हे गणिती स्फुरण होतं. भारतीय परंपरेमध्ये तर ज्ञान हे कधीच दिल्याने मिळते असे मानले गेले नाही. तर ज्ञान कायम आतून फुलत असते, असेच मानले गेले. अगदी वेद-उपनिषदे सुद्धा असेच आपल्या ऋषी-मुनींना स्फुरत गेले. आणि म्हणून आपण म्हणतो की वेद हे अपौरुषेय आहेत. याचा अर्थ असा की वेदांच्या निर्मितीमध्ये मानवी हस्तक्षेप नाही. थेट निसर्गानेच आपल्याशी समन्वय (Sync) असलेल्यांना प्रदान केलेली ती भेट आहे. भारतीय परंपरेमध्ये विज्ञान आणि अध्यात्म दोन्हींमध्ये या अंतर्ज्ञानाचा किंवा सिक्स्थ सेन्स चा खूप मोठा मोलाचा वाटा होता आणि त्याला महत्त्व दिले गेले होते. फक्त विज्ञान आणि अध्यात्म कशाला, अगदी नाट्य, संगीत, नृत्य, साहित्य, काव्य अशा प्रत्येक क्षेत्रात हे इंट्युशन अतिशय मोलाचं मानलं गेलं होतं. साहित्यक्षेत्रात नाही का अनेक कवींना कविता आणि मोठमोठी महाकाव्ये स्फुरत असायची. कविकुलगुरू कालिदासावर देवी सरस्वती प्रसन्न होती. जिथे पण देवता प्रसन्न आहे असा उल्लेख होतो, त्याचा अर्थ, मानवी प्रयत्नांच्या बाहेरची एखादी गोष्ट घडत आहे, एखादी दैवी निर्मिती होत आहे असा असतो. रामायण हे जगातील पहिले छंदोबद्ध काव्य ब्रहादेवांच्या कृपेने वाल्मीकींच्या मुखातून ओघवत्या प्रवाहासारखे विनाकष्ट बाहेर पडत गेले असा उल्लेख आपल्या इतिहासामध्ये आहे. आधुनिक काळात लॉजिकचं प्रस्थ जसजसं वाढत गेलं तसतसं अंतर्ज्ञानाला दिलं जाणारं महत्व कमी कमी होत गेलं. अगदी आजसुद्धा केवळ भारतीयच नव्हे तर अनेक विदेशी वैज्ञानिक आणि संगीतकार वगैरे लोक सुद्धा आपल्या निर्मितीला देवाची कृपा मानतात. आणि माझ्याकडून ईश्वराने हे काम करवून घेतलं हे मान्य करतात. यात केवळ विनम्र वृत्ती नाही, तर खरोखरच त्यांच्या त्यांच्या प्रकृती प्रमाणे निसर्ग हा ब्रह्मांडाशी एकरूप झालेल्या, sync असलेल्या व्यक्तींकडून वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वेगवेगळ्या निर्मिती घडवून आणत असतो. यालाच रामानुजन देवीचा आशीर्वाद असं म्हणत असे. रामानुजन साठी गणित हे काही शास्त्र नव्हतं कि कसला बौद्धिक अभ्यास नव्हता. गणित ही रामानुजन साठी त्याच्या देवाची आराधना होती. एक प्रकारचा पूज्यभाव होता. हिंदू परंपरे मधल्या कोणालाही ही गोष्ट विचित्र वाटणार नाही. कारण कला, साहित्य, नाट्य, संगीत या गोष्टी सुद्धा अध्यात्म साधनेचे वेगवेगळे मार्ग आहेत असं आपण मानतो. किंबहुना अध्यात्म साधनेसाठीच हे वेगवेगळे मार्ग आपल्या पूर्वजांनी शोधले आणि त्यासाठी शास्त्रशुद्ध विधी विकसित केल्या असं म्हटलं तरी ते वावगं नाही ठरणार. कोणतीही एक कला, शास्त्र वा विषयात पूर्णपणे झोकून देऊन त्या विषयाची साधना जे करतात, त्यांना परत वेगळ्या जप-तपाची., वेगळ्या उपासनेची गरज नसते. आणि त्यांनाच निसर्ग त्या विषयातली intuition अथवा अंतर्ज्ञान बहाल करतो. त्या विषयाप्रति संपूर्ण समर्पण आणि एकाग्रता साधली गेली की दैवी निर्मितीची सुरुवात होते. असो.
श्रीनिवास रामानुजनचं एक अप्रतिम वाक्य त्या चित्रपटात सांगितलं गेलंय. त्यात रामानुजन म्हणतो, “God speaks to me. Every mathematical equation means nothing to me, unless it’s an expression of God.” पण नेमका हाच मुद्दा प्रोफेसर हार्डी यांना खटकत होता. प्रोफेसर हार्डी हे पक्के नास्तिक. म्हणून देव धर्म इत्यादी गोष्टींवर त्यांचा विश्वास नाही. कुठलेही कर्मकांड त्यांना मान्य नाही. सुरुवातीला तर प्रॉफेसर हार्डी आणि त्यांचे सहकारी यांना “श्रीनिवास रामानुजन” हे एक थोतांड वाटलं. एक युरोपीय नसलेला माणूस एवढे मोठे सिद्धांत कसे काय मांडू शकतो, आणि ते ही कुठलेही युरोपीय शिक्षण न घेता ? आणि वर म्हणतो की माझी देवी मला गणित सांगते. हे नक्कीच काही गौडबंगाल आहे ! सुरुवातीचा काही काळ रामानुजनला आपला अस्सलपणा, ओरिजिनॅलिटी हार्डींसमोर सिद्ध करावी लागली. पण इतके करून सुद्धा हे देवी वगैरे प्रकरण हार्डीच्या पचनी पडणारे नव्हते. रामानुजनला ते समजावण्याचा प्रयत्न करायचे की ही कसलीही दैवी शक्ती नाही, तर तुझी स्वतःची गणिती बुद्धिमत्ता आहे त्याच्यामुळे तू एवढी असामान्य निर्मिती करू शकत आहेस. आता या वादामध्ये समस्या ही होती, कि रामानुजन हा थेट एखादा गणिती सिद्धांत मांडून द्यायचा. ते त्याला कुठून समजलं त्याचा त्याला स्वतःलाच काही पत्ता नसायचा. मनात स्फुरणाऱ्या गणिती सिद्धांतांना तो देवीचा आशीर्वाद मानून ग्रहण करायचा आणि कागदावर व्यक्त करायचा. परंतु प्रोफेसर हार्डी आणि एकूणच पाश्चात्त्य वैज्ञानिक समाज तार्किक कसोटीवर सर्व गोष्टी लावून बघत असल्याने पुराव्याशिवाय मांडलेला कुठलाही सिद्धांत हार्डींना मंजूर नव्हता. त्यामुळे प्रोफेसर हार्डीनचा आग्रह होता की रामानुजनने एखादं प्रमेय सिद्ध करायची गणिती पद्धत लौकिक शिक्षण घेऊन शिकून घ्यावी. आणि प्रमेये मांडत असतानाच ती सिद्ध करत जावी. पण रामानुजन ला कधी ही कृत्रिम मानवी पद्धत काही केल्या शिकायची इच्छा होईना. रामानुजन यांच्या दैवी प्रतिभेला मानवी साच्यात बसवण्यासाठी हार्डीचे प्रयत्न सुरु होते. त्यामुळे रामानुजनचं आणि खरं म्हणजे गणिताचंच खूप मोठं नुकसान झालं. ती पाश्च्यात्य आधुनिक पद्धत शिकण्याचा नादात त्याचा बराच वेळ आणि श्रम वाया जाऊ लागला. श्रीनिवास रामानुजनला ज्या वेगाने गणितीय निर्मिती करता आली असती, त्या निर्मितीच्या वेगाला हार्डींच्या या धोरणामुळे लगाम बसला आणि रामानुजन एखादा सिद्धांत मांडल्यावर पुढे बराच काळ ते तो सिद्धांत गणिती पायऱ्यांच्या आधारे सिद्ध करण्यासाठी, मानवी तर्काच्या चौकटीत बसवण्यासाठी बरीच खटपट करू लागला. खरंतर हार्डींचीही काही चूक नव्हती. त्यांना असं वाटत होतं “हार्डी-रामानुजन” या जोडीच्या नावाने जी गणिती कागदपत्रे प्रकाशित होतील, ती जर सिद्ध केलेली नसतील, तर त्यात काही चुका निघायची भीती त्यांना वाटत होती. गणिती वर्तुळात हार्डींची मोठी प्रतिष्ठा असल्याने, ती जोखीम त्यांना पत्करायची नव्हती. कारण रामानुजनची प्रमेय मांडायची पद्धत पण विलक्षण होती. तो गणिती सिद्धांत सिद्ध करताना पहिली पायरी, आठवी पायरी मग सरळ शेवटचं उत्तर असं काहीतरी प्रचंड वेगाने सोडवायचा. त्याची कित्येक प्रमेये आजसुद्धा जगभरातल्या गणितज्ञांसाठी अगम्य आहेत. आणि आजही जगभरातल्या विद्यापीठांमध्ये श्रीनिवास रामानुजनने मांडलेल्या प्रमेयांच्या मधल्या गाळलेल्या पायऱ्या सोडवण्यासाठी गणितज्ञ लोक डोकं खाजवत असतात. आपले प्राचीन काळातील शास्त्रज्ञ अथवा संशोधक ऋषीच का असत याचं उत्तर यातून मिळते. कारण ज्ञान हे निसर्गामध्ये आधीपासूनच विद्यमान असते. माणूस त्याला फक्त कागदावर व्यक्त करतो. श्रीनिवास रामानुजनने मांडलेली काही प्रमेये आज तब्बल शंभर वर्षांनंतर कृष्ण-विवरांच्या ( Black Holes) संदर्भातल्या संशोधनासाठी उपयुक्त ठरत आहेत. ज्याकाळी कृष्णविवरांच्या काहीच पत्ता नव्हता, त्या काळात हे गणित कसं काय निर्माण झाला असावं ? याचं कारण असं, की ते कृष्णविवर या जगात अस्तित्वात होतेच, आणि त्याचं गणितही अमूर्त रूपात या निसर्गात विद्यमान होतं. रामानुजनच्या माध्यमातून फक्त ते गणित समीकरणांच्या रूपात कागदावर मूर्त स्वरूपात आलं. महर्षी वाल्मिकी, कालिदास आणि तानसेन अशांसारख्याच्या मालिकेत बसावा असा श्रीनिवास रामानुजन हा “अपौरुषेय” प्रतिभेचा आधुनिक आविष्कार होता.
श्रीनिवास रामानुजनच्या कहाणीचा अंत काहीसा करुण वाटावा असाच आहे. रामानुजन कट्टर शाकाहारी होता. यामुळेच त्याला इंग्लंड मध्ये खाण्या पिण्याचे प्रचंड हाल झाले. त्याकाळी इंग्लंड मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शाकाहारी अन्न मिळणे अशक्य होते. त्यात रामानुजनला दुर्धर आजाराने ग्रासले. शिवाय दक्षिण भारतीय वातावरणाची सवय असताना तिथली जीवघेणी थंडी त्याला मानवली नाही. शिवाय तिथे जवळ कोणी आपला म्हणावं असं नाही. इंग्रज माणूस हा सामान्यपणे इतरांच्या गोष्टीत नाक न खुपसणारा आणि “ब्राऊन” लोकांशी जास्त संबंध न वाढवणारा. घरून पत्नीच्या पत्राची तो आतुरतेने वाट पाहत असे, पण त्याची आई रामानुजन आणि त्याच्या पत्नीचा पत्रव्यवहार होऊ नये याची पुरेपूर दक्षता घेत असे.
अशा सगळ्या परिस्थितीत, शरीराने खचलेला रामानुजन मनानेही खचला आणि मायदेशी परतला. त्या क्षयरोगाने ग्रासलेल्या देहाचा पुढे फार काळ टिकाव लागला नाही. त्या आजारपणातच १९२० साली वयाच्या अवघ्या बत्तिसाव्या वर्षी त्याचा मृत्यू झाला आणि हा दुर्दैवी प्रतिभावंत, अनंताचा उपासक अनंतात विलीन झाला.श्रीनिवास रामानुजनच्या प्रतिभेच मूल्य पाश्चात्य समाजाला समजलं नाही. त्यांना ते थोतांड, नक्कल, खोटं वाटलं. काय शोकांतिका ! श्रीनिवास रामानुजन कडे “गणिती प्रतिभा” होती. पण भारताला त्याकाळी गणिताचं मूल्य कळलं नाही आणि युरोपला प्रतिभेचं…